मराठीद्वेष्ट्या मंत्र्यांमुळेच सीमा भागातील मराठी गोत्यात...

राजेंद्र कोळी
Saturday, 18 January 2020

निपाणी मतदारसंघातील बहुतांश मराठी मतांवर विजयी झालेल्या व राज्याच्या मंत्री बनलेल्या शशिकला जोल्ले यांनी निपाणी भागातील नागरिकांनी कन्नड भाषा शिकावी, असा सल्ला दिला होता.

चिक्कोडी - जिल्ह्यात भारतीय जनता पक्ष सरकार सत्तेवर आल्यानंतर दोन मराठीद्वेष्ट्या मंत्र्यांची नियुक्ती झाली. जिल्हा पालकमंत्री वेगळे असले तरी जिल्ह्यातील मराठी प्रभाव खोडून काढण्यासाठी जिल्ह्यातीलच दोन्ही मंत्री पेटून उठले आहेत. मराठी भाषकांच्या बळावर निवडून आल्याचा विसर पडून मराठी भाषकांचा हक्क हिरावण्याचे काम सुरू आहे.

मराठी प्रभाव खोडण्याचा प्रयत्न

निपाणी मतदारसंघातील बहुतांश मराठी मतांवर विजयी झालेल्या व राज्याच्या मंत्री बनलेल्या शशिकला जोल्ले यांनी निपाणी भागातील नागरिकांनी कन्नड भाषा शिकावी, असा सल्ला दिला होता. उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी हे कायमच मराठी विरोधी राहिले आहेत. बोरगाव येथे एका मराठी शाळेच्या उद्‌घाटनप्रसंगी त्यांनी मराठीऐवजी कन्नड शाळा सुरु करण्याचा अनाहूत सल्ला रावसाहेब पाटील यांना दिला होता.निपाणीत यापूर्वी मराठीशी जवळीक असलेला आमदार निवडून येत असे. 
निवडणुकीत विजयासाठी मराठीत भाषण करणे, मराठी भाषकांवर प्रभाव पाडण्यासाठी महाराष्ट्रातील मराठी नेत्यांना आणणारे नेते आता आपल्या अधिकाराचा मराठीच्या ऱ्हासासाठी वापर करीत आहेत, हे स्पष्ट होत आहे.

पाहा - कर्नाटक पोलिसांना महाराष्ट्राच्या मंत्र्याने दिला असा चकवा...

मराठी भाषकांच्या बळावर निवडून आल्याचा विसर

यापूर्वी मंत्रीपद उपभोगलेल्या मंत्र्यांनी कधीही मराठीची गळचेपी करण्याचे धोरण अवलंबलेले नाही. मराठी भाषकही आपलेच असल्याने त्यांच्या कामात आडकाठी न आणता हक्कांचे संरक्षण केले. पण आता जिल्ह्यातील दोन्ही मंत्रीपदे मराठीद्वेष्ट्या नेत्यांच्या हाती असल्याने त्यांनी जिल्ह्यातीलच मराठीचे प्राबल्य कमी करण्यासाठी शासकीय यंत्रणा वेठीस धरली असल्याचे दिसून येत आहे.निपाणीत अलीकडे कन्नड कार्यक्रमांची रेलचेल वाढली आहे. मराठी भाषिकांचा त्याला फारसा प्रतिसाद नसला तरी बाहेरुन प्रेक्षक आणून कार्यक्रम यशस्वी करण्याचा खटाटोप सुरू आहे.

वाचा - बेळगावात धक्काबुक्की झालेल्या मंत्र्यांनी घेतली उध्दव ठाकरेची भेट...

मराठी फलक खुपतात

मराठी साहित्य संमेलन यशस्वी होत असल्याचे पाहून मठाधीशांच्या पुढाकाराने व काही युवकांच्या प्रयत्नाने कारदगा येथे काही वर्षांपासून कन्नड साहित्य संमेलन भरविण्यात येत आहे. कन्नड साहित्य संमेलनात सहभागी होणाऱ्या संमेलनाध्यक्ष व अतिथींना येथील मराठी भाषेतील फलक डोळ्यांत खुपतात. राजकीय नेते व अधिकारी या भागात कानडी वरवंटा फिरविण्याची सूचना देऊन जात आहेत. कारदगा साहित्य संमेलनाला भाषा बांधव्य संमेलन म्हणून संबोधण्यात येत असले तरी मराठीचे प्राबल्य कमी करण्यासाठी त्याचा वापर होत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Due to the bizarre ministers in the Marathi territory of the border area belgum marathi news