भीषण आगीत २५ एकरातील ऊस जळून खाक ; लाखोंचे नुकसान

दिलीप क्षीरसागर
Monday, 8 February 2021

शार्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

कामेरी (सांगली) : येथील कामेरी - तुजारपूर रस्त्या नजीकच असणार्‍या मदने वस्ती जवळील उसाला लागलेल्या आगीत सुमारे 25 एकर ऊस जळून खाक झाला. या घटनेत सुमारे पाच ते दहा लाखांचे नुकसान झाले. आज सकाळी अकराच्या सुमारास आग लागली. शार्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास सुरूवातीला एका उसाच्या फडाला आग लागली होती. यावेळी काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केले. परिसरातील शेतकऱ्यांनी ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. यावेळी अग्निशमन दलास फोन केला असता पाण्याने भरलेले बंब उपलब्ध नाहीत असे सांगण्यात आले. त्यामुळे ही आग लवकर आटोक्यात आणता आली नाही. या आगीत शहाजी पाटील, सुदर्शन पाटील, चंद्रकांत पाटील, सुनील पाटील, प्रदीप पाटील, सुभाष पाटील, कुमार मदने, मुकंद माळी, शंकर पाटील, उषा मदने, आशुतोष पाटील काका माने, राजाराम माने, राजाराम साळुंखे अशा दहा ते पंधरा शेतकऱ्यांचा पंचवीस  एकर ऊस जळून खाक झाला.

हेही वाचा - ...तर कोणतीही शिक्षा भोगायला तयार ; आघाडी सरकारमधील मंत्र्यांचे अमित शरा यांना आव्हान

आगीपासून बचावासाठी वस्तीवर असणाऱ्या अनेक जनावरांना लोकांनी बाहेर काढल्याने मोठी जीवितहानी टळली. मात्र आगीत शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. घटनास्थळी गाव कामगार तलाठी रामेश्वर शिंदे व कोतवाल आनंदराव ठोंबरे यांनी पंचनामा केला. विजय कापसे, श्रीकांत पाटील, काका माने अशोक पाटील आणि शेतकरी वर्गाने आग विझवण्यासाठी प्रयत्न केले. दरम्यान महावितरणचे कामेरी शाखेचे शाखा अभियंता जितेंद्र पाटील म्हणाले, आम्ही घटनास्थळी भेट दिली आहे. इस्लामपूर वरून आमचा विद्युत पुरवठा सकाळपासूनच बंद आहे. त्यामुळे ही आग शॉर्टसर्किटने लागली नसल्याचा खुलासा त्यांनी केला. 

 

संपादन - स्नेहल कदम  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: due short circuit sugarcane farm fire in kameri tujarpur road in sangli