पृथ्वीवासियांनो सावधान ! उद्या संकटाचा जवळून प्रवास .

e
e

उद्या  शुक्रवारी (ता.24) ऍस्टेरॉईड (Asteroid) 2020 ND नावाचा लघुग्रह पृथ्वीच्या जवळून जाणार आहे. या खगोलीय पाषाणाचा आकार शाळेच्या क्रीडांगणा इतका म्हणजे 170 मीटर्स लांबीचा असेल. ताशी 48 हजार किलोमीटर इतक्‍या प्रचंड वेगाने जाणारा हा पाषाण जर पृथ्वीवर आदळला तर मोठा उत्पात होऊ शकतो. मात्र घाबरुन जायचं कारण नाही कारण तो पृथ्वीपासून 50 लाख 86 हजार 328 किलोमीटर अंतरावरून निघून जाणार आहे.

शंकर शेलार, खगोल अभ्यासक

सूर्यमालेत मंगळ व गुरू ग्रहांच्या दरम्यान असंख्य लहान मोठे दगडधोंडे फिरतात. त्यापैकी शंभर मीटर पेक्षा लहान दगडांना अशनी meteoroid , तर त्यापेक्षा मोठ्या खडकांना लघुग्रह Asteroid म्हणून ओळखले जाते. छोटे मोठे अशनी नेहमीच पृथ्वीवर कोसळतात. 30 मीटर पर्यंत आकाराच्या अशनी पाताने पृथ्वीस फारशी हानी पोहोचत नाही. मात्र मोठ्या खडकांमुळे उत्पात घडू शकतो. 2020 ND या लघुग्रहाचा आकार 170 मीटर असल्याने त्याच्या आघाताने पृथ्वीस भयंकर हानी पोहोचु शकते. मात्र तो दुरून जाणार असल्याने पृथ्वीला आज त्याच्यापासून कसल्याही प्रकारचा धोका पोहोचणार नाही.
या लघुग्रहाला पाहण्यासाठी खास शक्तिशाली दुर्बिण लागेल. केवळ डोळ्यांनी याचे दर्शन घडण्याची सुतरामही शक्‍यता नाही. कारण हा लघुग्रह चंद्राच्या तुलनेत 17 हजार पटींनी छोटा आहे आणि तो चंद्राच्या कक्षेपेक्षा तब्बल 13 पट दूर अंतरावरून जाणार आहे.
अमेरिकेच्या नासाकडून अशा खगोलीय घटनाक्रमावर नजर ठेवली जाते. पृथ्वीच्या कक्षेपासून 0.05 खगोलीय एकक अंतर किंवा त्यापेक्षा कमी असते त्या लघुग्रहापासून पृथ्वीला धोका पोहोचण्याची शक्‍यता असते. Asteroid 2020 ND हा 0.034 खगोलीय एकक एवढ्या अंतरावरून जाणार असलेने याची गणना संभाव्य धोकादायक लघुग्रहांमध्ये केली जाते. अंतराळात भटकणारे हे खगोलीय पिंड बर्फ, पानी, खडक, धूळ अशा घटकांपासून बनलेले असतात. 6.5 कोटी वर्षांपूर्वी अशाच एका अशनीपातामुळे पृथ्वीवरील डायनोसोर्स नष्ट झाले होते. वैज्ञानिक प्रगतीमुळे माणूस पृथ्वीशी अशा संभाव्य टक्करींचे पूर्व अंदाज बांधू शकतो. त्याचे वेळापत्रक निश्‍चित करु शकतो. सध्याच्या अभ्यासानुसार पुढील शंभर वर्षांत 140 मीटर पेक्षा मोठ्या आकाराच्या एकाही लघुग्रहाची कक्षा पृथ्वीच्या कक्षेला छेदत नाही. ही त्यातली आनंदाची बातमी आहे.


(संपादन ः जयसिंग कुंभार, सांगली )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com