मिरज पूर्व भागात धो पावसात डांबरीकरणाचा घाट 

अजित झळके
Friday, 14 August 2020

स्ता लवकर खराब होणार, त्याची जबाबदारी कुणाची, असे अनेक प्रश्‍न यानिमित्ताने समोर आले आहेत. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रार करण्यात आली आहे. 

सांगली ः दिघंची ते हेरवाड या राज्य मार्ग 153 वर रस्ते कामाचे सारे नियम बासनात गुंडाळून काम सुरु आहे. मिरज पूर्व भागात मल्लेवाडी परिसरात धो पाऊस सुरु असताना ठेकेदाराने येथे डांबरीकरण सुरु केले आहे. या डांबरीकरणाची नेमकी घाई कुणाला झाली आहे? रस्ता लवकर खराब होणार, त्याची जबाबदारी कुणाची, असे अनेक प्रश्‍न यानिमित्ताने समोर आले आहेत. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रार करण्यात आली आहे. 

दिघंची ते हेरवाड हा राज्यमार्ग असून तो राज्य शासनाच्या हायब्रीड योजनेतून केले जात आहे. सुमारे सव्वाचारशे कोटी रुपयांचे हे काम आहे. मिरज पूर्व भागात या रस्त्याने चैतन्याचे वातावरण आहे, मात्र त्याच्या कामाच्या गुणवत्तेबाबत आता मोठे प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. पावसाळ्यात डांबरीकरणाचा कुठलेच काम करायचे नाही, असा नियम आहे. पाऊस पडत असतानाच नव्हे तर रस्ता ओला असेल तरीही डांबरीकरण करता येत नाही, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले. त्यानंतरही मिरज पूर्व भागात काम करणाऱ्या ठेकेदारांनी मनमर्जी सुरु केली आहे. 

पाणी हा डांबराचा शत्रू मानला जातो. आता सलग पाऊस सुरु आहे. रस्ते कामे काही ठिकाणी लोकांची गैरसोय होते आहे, वाहतूकीत अडथळे आहेत, मात्र त्यावर कुणीही नाराजी व्यक्त केलेली नाही. रस्त्याचे काम महत्वाचे अशीच लोकभावना आहे. मग, लवकर डांबरीकरण उरकण्याची घाई नेमकी कशासाठी केली जात आहे, हा मोठा प्रश्‍न आहे. या प्रकरणाची चौकशी करावी आणि किमान डांबरीकरणाचे काम थांबवावे, पाऊस थांबल्यानंतर ते सुरु करावे, अशी मागणी करण्यात येत आहे. आता झालेल्या डांबरीकरणाचे नुकसान झाले तर त्याची जबाबदारी कुणाची याचे उत्तरही द्यावे, अशी मागणी इथल्या लोकांनी केली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: eastern part of Miraj road work in heavy rains