विजेचे खांब कोसळले; आठ जण बचावले 

विजेचे खांब कोसळले; आठ जण बचावले 

ढेबेवाडी (जि. सातारा) : सडलेला लोखंडी ताण अचानक तुटल्याने प्रवाहित वाहिन्यांसह विजेचे दोन खांब कोसळल्याची घटना नुकतीच धनगरवाडा (काळगाव, ता. पाटण) येथे घडली. यावेळी प्रसंगावधान राखून बालकासह आठ जण आणि काही जनावरे सुदैवाने बाजूला पळाल्याने बचावली. वीज वाहिन्या तुटून खाली पडल्यानंतर तेथे गवत व झुडपांनी पेट घेतला होता. मात्र, वन कर्मचाऱ्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने तत्काळ त्यावर नियंत्रण मिळविल्याने आग वनहद्दीत घुसता-घुसता वाचली. मोठे नुकसानही टळले.
 
याबाबतची माहिती अशी, काळगावपासून सुमारे सात किलोमीटरवर डोंगरात वसलेल्या धनगरवाड्यापासून जवळच असलेल्या शिवारात पाणीपुरवठ्याच्या विहिरीजवळून गेलेले विजेचे दोन खांब अचानक कोसळले. या खांबांना दिलेला लोखंडी ताण जमिनीजवळ सडलेला होता. जवळच चरायला सोडलेल्या म्हशीने त्याला अंग घासल्याने तो तुटला आणि दोन्ही खांब कोसळले, असे प्रत्यक्षदर्शींकडून सांगण्यात आले. ही घटना घडली त्यावेळी तेथे जनावरे चरण्यासाठी घेवून आलेल्या दोन महिला, त्यांच्यासोबत असलेले एक बालक आणि पाइपलाइनसाठी खोदाई करणारे तीन कामगार तेथे होते. वनरक्षक विशाल डुबल व वसंत मोरे त्यावेळी तेथूनच वनक्षेत्रात निघाले होते. अचानक घडलेल्या या घटनेने सर्वजण घाबरून गेले होते. या घटनेची माहिती तातडीने वीज कर्मचाऱ्यांना देण्यात आली. त्यांनी तातडीने तेथे येवून वीजपुरवठा बंद केला. वनकर्मचारी मुबारक मुल्ला हेही लगेच घटनास्थळी आले. विजेच्या प्रवाहित वाहिन्या वाळलेल्या गवतात आणि झुडपात पडल्याने स्पार्किंग होवून ठिणग्या पडून गवताने पेट घेतला होता. तेथून काही अंतरावरच वनहद्द असल्याने वनकर्मचाऱ्यांनी हिरव्या फांद्यांच्या साह्याने आग विझवली व जंगल तसेच अन्य मालकी क्षेत्र आगीपासून वाचवले. 

खांबांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर 

ढेबेवाडी विभागातील विशेषतः डोंगर भागातील गावे आणि वाड्यावस्त्यांवर विजेच्या गंजलेल्या खांबांचा प्रश्न अनेक वर्षांपासून जटिल बनलेला आहे. गंजलेले अनेक खांब कोसळण्याच्या स्थितीत आहेत. गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या विशेष प्रयत्नांतून तालुक्‍यासाठी विजेचे नवीन खांब मंजूर झाले असून ते बसवायला काही ठिकाणी सुरवातही झाली आहे. पण, अजूनही अनेक गावांत असे धोकादायक खांब उभेच आहेत. वळीव व वादळी पावसाचे दिवस जवळ आल्याने असे धोकादायक खांब बदलण्यास प्राधान्य देण्याची गरज निर्माण झाली आहे.

वाचा : नराधमांनी माझ्या मुलाचा घात केला; न्याय मिळावा; आईची आर्त हाक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com