नराधमांनी माझ्या मुलाचा घात केला; न्याय मिळावा; आईची आर्त हाक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नराधमांनी माझ्या मुलाचा घात केला; न्याय मिळावा; आईची आर्त हाक

विधी आटोपल्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी येथील ग्रामपंचायत कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला. खून प्रकरणातील संशयितांपैकी साहील शिकलगार व आशिष साळुंखे हे नागठाण्यातील रहिवासी आहेत.

नराधमांनी माझ्या मुलाचा घात केला; न्याय मिळावा; आईची आर्त हाक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागठाणे (जि. सातारा) : "गेली अडीच महिने आम्ही सारेजण तेजसची चातकाप्रमाणे वाट पाहत होतो. तो आज सुखरूप येईल... उद्या सुखरूप येईल... हीच आमची आशा होती... मात्र, शेवटी नराधमांनी माझ्या मुलाचा घात केला. त्यांना कठोर शासन करून माझ्या निष्पाप तेजसला न्याय द्यावा,' अशी एका आईची आर्त हाक ऐकताच उपस्थितांची मने हेलावून गेली. आष्टे (पुनर्वसित, ता. सातारा) येथील तेजस जाधवचा 25 लाख रुपयांच्या खंडणीसाठी निर्घृण खून करण्यात आला. येथील उरमोडी नदीकाठी रविवारी रक्षाविसर्जन विधी झाला. या वेळी तेजसच्या नातेवाइकांसह परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
"आज आमच्या मुलावर अशी वेळ आली, उद्या तुमच्याही मुलांवर असा भीषण प्रसंग ओढवू शकतो. या प्रकरणातील गुन्हेगार अत्यंत क्रूर व निर्दयी आहेत. यापूर्वीही या गुन्हेगारांना गावातीलच काही लोकांनी मदत केली. त्यामुळेच त्यांची खून करण्यापर्यंत मजल गेली. आता या गुन्हेगारांना नागठाणे गावातील कोणीही मदत करू नका. त्यांना जामीनही होऊ नका', असे आवाहन मोर्चातील आष्टे ग्रामस्थांनी केले. बोरगाव पोलिसांनी या खुनाच्या घटनेचा अत्यंत सखोल व नि:पक्षपातीपणे तपास करावा. या गुन्ह्यात अजूनही संशयित असण्याची शक्‍यता असून पोलिसांनी त्यांना लवकरात लवकर अटक करावी. जे कोणी गुन्हेगारांना मदत करतील, त्यांच्यावरही कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली.

जरुर वाचा : राजे की राजकारणी ? जबाब द्या

यावेळी उपस्थित नागठाण्यातील ग्रामस्थांनी गुन्हेगारांना कोणत्याही प्रकारची मदत केली जाणार नाही. संपूर्ण नागठाणे गाव आष्टे ग्रामस्थांच्या, जाधव कुटुंबीयांच्या दुःखात आणि त्यांच्या पाठीशी उभे असल्याचे सांगितले. उपस्थित ग्रामस्थांनी तेजसला श्रद्धांजली वाहिली. नागठाण्याचे सरपंच विष्णू साळुंखे, अजिंक्‍यतारा कारखान्याचे संचालक यशवंत साळुंखे, सोसायटीचे अध्यक्ष संजय साळुंखे, प्रगतशील शेतकरी मनोहर साळुंखे, बोरगावचे सहायक पोलिस निरीक्षक चंद्रकांत माळी या वेळी उपस्थित होते. 

ज्या दिवशी गुन्हेगारांना न्यायालय कठोर शिक्षा देईल, तीच तेजसला श्रद्धांजली असेल, असे पोलिस अधिकारी चंद्रकांत माळी यांनी उपस्थित ग्रामस्थांपुढे नमूद केले. घडलेला गुन्हा हा संशयितांनी अत्यंत क्रूरपणे व शांत डोक्‍याने केला आहे. पोलिस दल या गुन्ह्याच्या अनुषंगाने तपासात कोणतीही कसर बाकी ठेवणार नाही. गुन्हेगारांना जास्तीत जास्त शिक्षा लागण्यासाठी आम्ही प्रयत्न करणारच आहोत. पोलिसांना तपासकामात सहकार्य करावे, गुन्हेगारांना जास्तीत जास्त शासन कसे करता येईल यादृष्टीने मदत करावी, असे आवाहनही त्यांनी केले.

हेही वाचा : ...अन्‌ तेजसचे लष्कर भरतीचे स्वप्न हवेत विरले

loading image
go to top