esakal | तीस गावात रुजणार 'एक गाव एक गणपती'
sakal

बोलून बातमी शोधा

ganpati

तीस गावात रुजणार 'एक गाव एक गणपती'

sakal_logo
By
अजित माद्याळे

गडहिंग्लज : यावर्षीच्या गणरायाचे वेध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना लागले आहेत. परंतु एक गाव एक गणपती या संकल्पनेला यंदा प्रतिसाद कमी मिळण्याचे संकेत मिळत आहेत. गतवर्षीपेक्षा ही संकल्पना राबवणार्‍यांच्या संख्येत घट येण्याची शक्यता दिसत असून यंदा गडहिंग्लज व नेसरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत एकूण सुमारे ३० गावात ही संकल्पना रुजेल असे सांगण्यात येते. या संख्येत भर घालण्यासाठी पोलिस विभागाकडून प्रबोधन वाढविण्याची गरज व्यक्त होत आहे.

गतवर्षीपासून गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट आहे. या उत्सवात मोठ्या प्रमाणात असणार्‍या उत्साहाला कोरोनाच्या निर्बंधामुळे मर्यादा येत आहेत. यंदाही कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर शासनाने गणेशोत्सवावर निर्बंध घातले आहेत. मूर्तीच्या उंचीवर मर्यादा घालण्यासह सामुहीक कार्यक्रमावरही निर्बंध जाहीर केले आहेत. यामुळे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये निरुत्साहाचे वातावरण आहे. परंतु गणेशमूर्ती प्रतिष्ठापना करण्यासाठी सार्‍याच मंडळांची तयारी सुरु झाली आहे.

हेही वाचा: शरण या किंवा मरा; तालिबानची धमकी देणारी पत्रे दारांवर

अलीकडील काही वर्षापासून एक गाव एक गणपती ही संकल्पना रुजवण्यासाठी पोलिस यंत्रणा सक्रीय असते. मात्र यंदा अजून प्रबोधनाच्या पातळीवर कोणत्याच हालचाली सुरु झालेल्या नसल्या तरी पोलिस विभागाने बैठक घेवून गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकार्‍यांना सूचना दिलेल्या आहेत. सार्वज़निक मंडळांकडून ऑनलाईन फॉर्म भरुन घेण्याची प्रक्रियाही सुरु झाली आहे.

गतवर्षी गडहिंग्लज पोलिस ठाण्याच्या हद्दीत २७ गावांत एक गाव एक गणपतीची संकल्पना राबविली होती. यंदा मात्र ही संख्या १५ ते २० पर्यंत राहण्याची शक्यता पोलिस सूत्रांनी वर्तविली आहे. नेसरी पोलिस ठाण्याच्या अंतर्गत २५ गावे येतात. गतवर्षी केवळ नेसरी येथेच मुख्य चौकात एका गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली होती. उर्वरित २४ गावांतील मंडळानी गणेशोत्सव रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. यंदा मात्र या विभागातही गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना होणार असून साधारण १२ ते १२ गावातच एक गाव एक गणपतीची संकल्पना राबवणार असल्याचे सांगण्यात येते. मंडळांकडून माहिती घेण्याचे काम सुरु आहे. यामध्ये वाढही होती किंवा घटही होईल अशी शक्यताही पोलिसांनी वर्तविली. अलीकडील दोन-तीन वर्षात एक गाव एक गणपती संकल्पना राबवण्याकडे दुर्लक्ष होत असून किमान यंदा तरी ही संकल्पना अधिक गतीने राबवण्यासाठी प्रयत्न होण्याची गरज आहे.

हेही वाचा: नागरिकांमध्ये तालिबानची दहशत;पाहा व्हिडिओ

अनावश्यक खर्च टाळा...

कोरोनामुळे विविध क्षेत्रावर आर्थिक संकटाचे ढग आले आहेत. यामुळे उत्सवातील अनावश्‍चक खर्च टाळण्यासाठी अधिकाधिक गावात एक गाव एक गणपतीची संकल्पना रुजण्याची आवश्यकता आहे. जास्तीतजास्त मंडळांचा सहभाग मिळवण्यासाठी पोलिस व लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेवून मंडळांमध्ये प्रबोधन करण्याची गरज व्यक्त होत आहे.

loading image
go to top