मढी यात्रेसाठी खास बनवली जाते 'रेवडी'

सुनील अकोलकर
मंगळवार, 23 जानेवारी 2018

क्षेत्र मढी येथे रंगपंचमीला कानिफनाथ महाराजांची यात्रा भरत असते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक या यात्रेला येत असतात. नाथांचा प्रसाद म्हणून भाविक रेवडी खरेदी करतात. त्यामुळे लाखो रुपयांच्या रेवडीची विक्री या यात्रेत होत असते. ही यात्रा आता जवळ आल्याने आता रेवडी तयार करण्याच्या कामाने वेग घेतला आहे.

तिसगाव(नगर) : मढी यात्रा जवळ आल्याने 'रेवडी' तयार करण्याच्या कामाला वेग आला आहे. कच्या मालाचे दर जैसे थे असल्याने यंदाही रेवडीचे दर मागील वर्षाप्रमाणेच 80 ते 100 रुपये किलो राहणार आहे. 

श्रीक्षेत्र मढी येथे रंगपंचमीला कानिफनाथ महाराजांची यात्रा भरत असते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक या यात्रेला येत असतात. नाथांचा प्रसाद म्हणून भाविक रेवडी खरेदी करतात. त्यामुळे लाखो रुपयांच्या रेवडीची विक्री या यात्रेत होत असते. ही यात्रा आता जवळ आल्याने आता रेवडी तयार करण्याच्या कामाने वेग घेतला आहे. जवळपास डिसेंबर महिन्यापासूनच रेवडी बनविण्याच्या कामाला सुरुवात होते. गूळ, फुटाणे, हावरी यांच्या मिश्रणापासून ही रेवडी तयार केली जाते. गूळ फोडून त्याला चाचणी दिली जाते. त्यात फुटाण्याचे पीठ टाकून चिक्की तयार झाल्यानंतर त्यावर मेहनत केली जाते. व नंतर पाहिजे त्या आकाराच्या रेवडी तयार केल्या जातात व त्यावर हावरी लावली जाते. उन्हाळ्यात रेवडी आरोग्यासाठी फायदेशीर मानली जाते.

यात्रेत तिसगाव ची रेवडी प्रसिद्ध असल्याने मोठया प्रमाणात रेवडीचे उत्पादन गावात दरवर्षी होत असते. सुमारे सहा ते सात हलवाई रेवडी बनविण्याचे काम गावात करतात. येथील सिकंदर पठाण व त्यांचा मुलगा फिरोज पठाण ( हलवाई ) यांनी सांगितले की जुन्या पिढीपासून हा आमचा व्यवसाय चालू आहे. पूर्वी कामगारांची फार अडचण जाणवत असे. आता चिक्की वर मेहनत करण्यासाठी, गुळ फोडण्यासाठी तसेच रेवडी प्रेस करण्यासाठी यंत्र आल्याने हे काम आता सोपे झाले आहे. तसेच यंत्रामुळे माल तयार करण्यास वेळ कमी लागत आहे. मढी यात्रे बरोबरच इतर यात्रेही रेवडीची चांगली विक्री होत असते असेही पठाण यांनी सांगितले. तिसगावसह पाथर्डी आणि करंजी येथे देखील रेवडीचे उत्पादन केले जाते

Web Title: esakal marathi news madhi fair news