ग्रामीण साहित्य संमेलनात राजू शेट्टी म्हणाले,

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 15 December 2019

दरम्यान सकाळी ग्रंथदिडीने संमेलनाची सुरवात झाली. महादेव मंदिरामध्ये धवल पाटील, सुकुमार मगदूम यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते ग्रंथदिंडीला सुरवात झाली. जयसिंगपूर महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे विद्यार्थी, प्राथमिक व माध्यमिक शाळेचे विद्यार्थी व ग्रामस्थ सहभागी झाले होते.

दानोळी ( कोल्हापूर ) - “साहित्य संमेलनातून समाजामध्ये काय चाललय हे कळंत. त्याचा उपयोग आम्हाला चळवळीत होतो. समाजातील कष्टकरी, सर्वसामान्य माणसांची वेदना ग्रामीण साहित्यिक करतात. त्यामुळेच ग्रामीण संमेलने अनुदानीत संमेलनापेक्षा लोकप्रिय ठरतात, असे मत माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज निमशिरगाव येथे मांडले.

निमशिरगांव (ता. शिरोळ) येथे साहित्य सुधा कला, क्रीडा, शैक्षणिक व सांस्कृतिक मंच व ग्रामस्थांच्यावतीने आयोजित 23 व्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात श्री. शेट्टी बोलत होते. 

भगवे कपडे, झेंडे म्हणजे....

“भगवे कपडे, झेंडे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार नव्हेत. ते या मातीत पेरले आहेत, ते आपण विसरलो आहे. तसेच ढोंगी माणसाचे पडदे उघडे करण्यात काम तुम्ही - आम्ही साहित्यिकांनी करायचे आहेत. तरच त्यांचे विचार समाजमनात उतरेल. हे काम ग्रामीण साहित्यिक चांगल्या प्रकारे करीत आहे.” असे प्रतिपादन जेष्ठ साहित्यिक व पत्रकार महावीर जोंधळे यांनी केले. त्यांनी समाजातील स्त्री-पुरुष भेद, आजचा तरुण, त्यांचे वाचन, साहित्य, संस्कृती, समाज परिवर्तन, शिक्षण, गावगाडा, राजकारण अशा विविध प्रश्नावर प्रकाश टाकला.

ग्रंथदिडीने संमेलनाची सुरवात

दरम्यान सकाळी ग्रंथदिडीने संमेलनाची सुरवात झाली. महादेव मंदिरामध्ये धवल पाटील, सुकुमार मगदूम यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते ग्रंथदिंडीला सुरवात झाली. यामध्ये जयसिंगपूर महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे विद्यार्थी, प्राथमिक व माध्यमिक शाळेचे विद्यार्थी व ग्रामस्थ सहभागी झाले होते. गावातील प्रमुख मार्गावरून ग्रंथदिंडी संमेलन मंडपात दाखल झाली. 

'साहित्य सुधा' या स्मरणीकेचे प्रकाशन

संमेलनाचे उद्घाटन विमल मोरे, स्वरुपा पाटील - यड्रावकर, समेंलनाध्यक्ष या मान्यवरांच्या हस्ते झाले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते 'साहित्य सुधा' या स्मरणीकेचे, डॉ. सुनंदा शेळकेंच्या ‘गझलगंध’ गझलसंग्रहाचे, प्रा. मोहन पाटीलांच्या ‘पाचुंदा’ कादंबरीच्या दुसऱ्या आवृत्तीचे व डॉ. राजेंद्र कुंभार यांच्या भाषणाच्या सिडीचे, मोहन तोडकरांच्या ‘शब्दगंधा’ काव्यमालेचे प्रकाशन करण्यात आले. सौ. विमल मोरे म्हणाल्या, “समाजात सामान्यांपर्यंत संवेदनशील विचार रुजवायचं काम साहित्यिक करतात. स्त्रि हि सृजनतेचे प्रतिक आहेत. आता स्त्रियांच्या जडणघडणीसाठी साहित्य महत्वाच आहे. ते निर्माण करण्याच काम प्रत्येकाच आहे.”

यंदाच्या संमेलनात महिला सक्षमीकरणाचा जागर

सौ. स्वरुपा पाटील यड्रावकर म्हणाल्या, निमशिरगांवमध्ये गेली 22 वर्षे नवीन विचार रुजविण्याच काम होत आहे. या साहित्यिकांच्या विचार मंथनातून नवनिर्मित, परिवर्तन, समाज घडविण्याच कार्य होत आहे. त्यामुळे निमशिरगांव क्रांतीकारांचे गाव आहे. यावर्षी हे साहित्य संमेलन महिला सक्षमीकरणाचा जागर करणारा ठरेल. यावेळी प्राचार्य श्रीधर हेरवाडे, विजय बेळंके, डॉ. महावीर अक्कोळे, प्रा. शांताराम कांबळे, उपस्थीत होते. प्रास्ताविक डॉ. आहिल्या पुजारी यांनी केले. स्वागत सुप्रिया मगदून यांनी केले. सुत्रसंचालन संगिता पाटील यांनी केले. आभार समृध्दी पाटील यांनी मानले.

गावरान जेवणाची लज्जत

प्रत्येक वर्षाच्या परंपरेप्रमाणे यावर्षी देखील भाकरी, भरलं वांग, आमटी, खर्डा, दही, भात अशी गावरान मेजवानी होती. 
संमेलनाची सूत्रे महिलांच्या हाती. निमशिरगांवचे साहित्य संमेलन रौप्य महोत्सवाकडे वाटचालीकडे असताना स्वागतापासून-आभारापर्यंत सर्व जबाबदारी स्त्रियांनी घेतली. पुरस्कार प्राप्त, स्वागताध्यक्ष इतर सत्रातील वक्ते महिलाच होत्या.

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ex MP Raju Shetti Comment In Nimshirgaon Rural Literature Conference