परीक्षा तर रद्द झाल्याच, भरलेले शुल्कही मिळेना

exam cancelled but fees of exam not return from related university in belgaum
exam cancelled but fees of exam not return from related university in belgaum

बेळगाव : कोरोनामुळे पदवी व पदव्युत्तरच्या पहिल्या आणि दुसऱ्या वर्षातील परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. तत्पूर्वी संबंधित विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क भरुन घेतले होते. मात्र, परीक्षा रद्द होऊनही या शुल्काबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. विद्यापीठाने विचार करुन परीक्षा शुल्क परत करावे, अशी मागणी विद्यार्थ्यांतून होत आहे. 

दरवर्षी मार्च ते मे दरम्यान पदवी व पदव्युत्तर परीक्षा होतात. मात्र, यंदा मार्चपासून कोरोनामुळे लॉकडाउन झाले होते. त्यामुळे अंतिम वर्षाच्या परीक्षा वगळता इतर सर्व परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. परीक्षा होणार म्हणून संबंधित विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्कही विद्यापीठाने भरून घेतले होते. मात्र, परीक्षाच रद्द झाल्यामुळे परीक्षा शुल्क परत करण्याची मागणी होत आहे.

कोरोनामुळे रद्द झालेल्या परीक्षांचा निकाल कसा लावावा, यासंबंधी उच्चशिक्षण खाते व कुलगुरुंची सोमवारी (7) बंगळूर येथे बैठक होणार आहे. त्या बैठकीत उपरोक्त विषय चर्चेला जाऊन यावरही तोडगा निघावा, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. बेळगावमध्ये विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या अनेक विद्यार्थी संघटना कार्यरत आहेत. मात्र, यासंबंधी विद्यार्थी संघटनांची चुप्पी दिसून येत आहे.

पदवीच्या पहिल्या व दुसऱ्या वर्षातील व पदव्युत्तरच्या पहिल्या वर्षातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द झाल्या होत्या. या विद्यार्थ्यांनी परीक्षा शुल्क भरलेले आहे. त्यांच्या परीक्षा रद्द होऊन पुढील सेमिस्टरची प्रवेश प्रक्रियाही पूर्ण झाली आहे. पुढील महिनाभरात पुढील सेमिस्टरसाठी पुन्हा परीक्षा शुल्क भरावे लागेल. यासंबंधी राज्य सरकार व विद्यापीठाने विचार करुन पुढील सेमिस्टरसाठीचे परीक्षा शुल्क घेऊ नये, अशी मागणी विद्यार्थ्यांतून केली जात आहे. 

"कोरोनामुळे विद्यापीठाच्या परीक्षा रद्द झाल्या होत्या. तत्पूर्वी, विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क भरुन घेतले होते. परीक्षा शुल्क परत करण्याचा निर्णय विद्यापीठ घेऊ शकत नाही. यासंबंधी राज्य सरकार निर्णय घेणार आहे." 

- डॉ. रामचंद्रगौडा, कुलगुरू, राणी चन्नम्मा विद्यापीठ  

संपादन - स्नेहल कदम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com