कर्नाटकातील त्या विद्यार्थ्यांची परीक्षा केंद्रे बदलणार

सकाळ वृत्तसेवा
Friday, 5 June 2020

examination centers students in Karnataka changed

राज्यातील 12 हजार 647 विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रे बदलण्याची इच्छा व्यक्त केली असून त्यांना त्यांच्या पसंदीच्या केंद्रांवर परीक्षा देण्याची मुभा देण्यात येणार आहे.

बंगळूर : राज्यातील 12 हजार 647 विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रे बदलण्याची इच्छा व्यक्त केली असून त्यांना त्यांच्या पसंदीच्या केंद्रांवर परीक्षा देण्याची मुभा देण्यात येणार असल्याची माहिती, प्राथमिक व माध्यमिक शिक्षणमंत्री एस. सुरेश कुमार यांनी दिली. कंटेन्मेट विभागातील परीक्षा केंद्रे तातडीने स्थलांतरित करण्याची सुचनाही त्यांनी यावेळी केली. 

दहावी परीक्षेच्या पूर्व तयारीसाठी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पोलिसप्रमुख, जिल्हा व तालुका कोषागार अधिकारी, जिल्हा शिक्षणाधिकारी आणि गटशिक्षणाधिकारी यांच्याशी व्हिडीओवरुन संवाद साधताना त्यांनी सांगितले की, दहावी परीक्षेसंदर्भात जिल्हास्तरावर हेल्पलाईन सुरू करावी. परीक्षेपूर्वी कंटेन्मेट झोनमधील परीक्षा केंद्रे सोयीच्या ठिकाणी स्थलांतरित करण्याची सूचना करण्यात आली आहे. सध्या बंगळुरातील पाच केंद्रे स्थलांतरित करण्यात येणार आहेत. 

दहावीच्या उत्तरपत्रिकांचा संग्रह निवडणूक स्ट्रॉंगरुम प्रमाणे सुरक्षित केला जाणे आवश्‍यक आहे. परीक्षेसाठी सुरक्षेची व्यवस्था करण्याच्याही त्यांनी सूचना केल्या. विद्यार्थ्यांच्या हितासाठी तातडीने हेल्पलाईन सुरू करावी, पावसाळ्यामुळे परीक्षा केंद्रांची आवश्‍यक दुरूस्ती करावी, सीमावर्ती भागातून परीक्षेसाठी येणाऱ्या मुलांसाठी बस वाहतुकीची सुविधा द्यावी, प्रत्येक परीक्षा केंद्रात आरोग्य कर्मचारी नियुक्त करावेत आदी सूचना त्यांनी यावेळी दिल्या. परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत बस व्यवस्था उफलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: examination centers students in Karnataka changed