esakal | सांगली शासकीय रुग्णालयात मृतदेहाची आदलाबदल

बोलून बातमी शोधा

Exchange of bodies at Sangli Government Hospital}

सांगली  येथील वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयात काल रात्री मृतदेहांची आदलाबदल झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला.

paschim-maharashtra
सांगली शासकीय रुग्णालयात मृतदेहाची आदलाबदल
sakal_logo
By
शैलेश पेटकर

सांगली : येथील वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयात काल रात्री मृतदेहांची आदलाबदल झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला. कर्नाटकातील नातेवाईकांना महिलेऐवजी पुरुषाचा मृतदेह देण्यात आला. नातेवाईकांनीही शहानिशा न करता मृतदेह रुग्णवाहिकेत घालून नेला. काही तासांनी ही चूक लक्षात आल्यानंतर पुन्हा नातेवाईक रुग्णालयात आले आणि आपल्या नातेवाईक महिलेचा मृतदेह घेऊन गेले. दरम्यान, या प्रकाराची सिव्हिल प्रशासाने गंभीर दखल घेतली असून, चौकशीसाठी समिती नियुक्त केली आहे. 

याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, की संबंधित महिलेवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना काल रात्री मृत्यू झाला. त्यानंतर तशी माहिती रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी नातेवाईकांना दिली. नातेवाईकांनी मृतदेह गावाकडे न्यायचे ठरवले. इकडे नातेवाईकांनी कर्नाटकातील गावी महिलेचा मृतदेह नेण्याची तयारी केली.

यावेळी रुग्णालयातील आणखी एका पुरुष रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. दोन्ही मृतदेह पूर्णपणे झाकले होते. डॉक्‍टरांनी कर्नाटकातील नातेवाईकांना महिलेऐवजी पुरुषाचा मृतदेह दिला. नातेवाईकांनीही मृतदेह कोणाचा आहे? याची खात्री न करता तो ताब्यात घेतला आणि रुग्णवाहिकेतून निघून गेले. 

कर्नाटकातील नातेवाईकांना महिलेच्या मृतदेहाऐवजी पुरुषाच मृतदेह दिल्याची घटना काही तासांनी रुग्णालयात उघडकीस आली. चूक लक्षात आल्यानंतर स्टाफने त्या नातेवाईकांना फोन करुन संपर्क साधला. त्यानंतर नातेवाईकांनी पुन्हा सांगली शासकीय रुग्णालयाचा रस्ता धरला. मृतदेह घेऊन ते रुग्णालयात आले. रुग्णालयाने त्यांच्याकडील पुरुषाचा मृतदेह ताब्यात घेतला आणि महिलेचा मृतदेह ताब्यात दिला. 

दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल

घडलेला प्रकार अत्यंत चुकीचा आहे. याची गंभीर दखल घेण्यात आली असून, चौकशी समिती नियुक्त करण्यात आली आहे. सिव्हिल स्टाफ आणि नातेवाईक या दोघांचीही मृतदेह नेताना जबाबदारी आहे. उद्या अहवाल प्राप्त झाल्यानंतर दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल. 
- नंदकिशोर गायकवाड, वैद्यकीय अधीक्षक, सांगली