

सांगली : कोण डॉक्टर...कोण अभियंता...कोण वास्तुविशारद तर कोण उद्योजक, पण सगळ्यांचा चित्रकला हा कॉमन छंद. शालेय जीवनानंतर दूर गेलेल्या कलेला पुन्हा पालवी फुटली आणि साकारल्या एक से बढकर एक चित्रकृती. दोन-अडीच महिन्यांतच प्रख्यात कलाकार मृणाल नाटेकर यांनी या नारीशक्तीला एक आत्मविश्वास देत त्यांच्यातील दडलेली कलाकारी बाहेर काढली. त्यांच्या कुंचल्यातून साकारलेल्या कलाकृतींचे चित्रप्रदर्शनही भरवत नवी उमेद पेरली.
मूळच्या ठाणेवासीय मृणाल नाटेकर या कलासक्त महिलेने सांगलीत अनेक उपक्रम विनामूल्य राबवले आहेत. रांगोळी, पुष्परचना, रंगभरण यासह चित्रकलेत हातखंडा असल्याने त्यांच्या कलाविकास शिबिरांना गर्दी असते. दिव्यांग व गतिमंद विद्यार्थ्यांसह महापालिका, जिल्हा परिषद शाळेतील कलेची आवड असणाऱ्या गरजूंना त्या मोफत मार्गदर्शन करतात. खास महिलांसाठी त्यांनी चित्रकला वर्ग सुरू केले आहेत. पण ही बॅच थोडी वेगळी होती. शहरातील वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना चित्रकलेचे धडे देताना त्यांच्याच कलाकृतींचे प्रदर्शन भरवण्याची संकल्पना समोर आली.
नेहमी औषध, सुई, रुग्णांच्या सानिध्यात असणाऱ्या डॉक्टर महिलांनी अनेकविध रंगांची दुनिया कॅनव्हासवर साकारली. तर दररोजच्या दुनियादारीत गुरफटलेल्या गृहिणींनीही त्याच ताकदीने आपल्यातील कलेचे दर्शन घडवले. त्यातील निवडक चित्रांचे प्रदर्शन येथील इंजिनिअर्स अँड आर्किटेक्ट असोसिएशनच्या दालनात झाले. प्रारंभी कॅमलिनतर्फे आर्ट डेमोचे आयोजन करण्यात आले होते. फ्लुईड आर्ट, फॅब्री पेंटिंग, ब्रश स्ट्रोक्स यासह अन्य विषयांवर कॅमलिन कंपनीच्या तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.
भक्ती चितळे, पल्लवी फडणीस, प्रांजली भिडे, संपदा कानिटकर, अस्मिता कुलकर्णी, दिशा कुलकर्णी, डॉ. ज्योती कुलकर्णी, सुखदा कुलकर्णी, सुनंदा कुलकर्णी, ज्योती पटवर्धन, श्रद्धा प्रताप, नेहा सारडा, हर्षा शहा यांच्यासह डॉ. आरती परांजपे यांच्या वैविध्यपूर्ण कलाकृतींना रसिकांनी दाद दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.