esakal | बेळगाव : येळ्‍ळूर साहित्य संमेलनात नेटके नियोजन आणि दर्जेदार सत्रे

बोलून बातमी शोधा

exhibition of yellur in belgaum with planning and corona precautions}

आतापर्यंत झालेली सर्व संमेलने यशस्वी झाली आहेत. सीमाभागात अजूनही काही संमेलने होणार असून त्याचे नियोजन सुरू आहे.

बेळगाव : येळ्‍ळूर साहित्य संमेलनात नेटके नियोजन आणि दर्जेदार सत्रे
sakal_logo
By
सतीश जाधव

बेळगाव : सीमाप्रश्‍नाचा ठराव, वक्‍त्यांची सडेतोड भाषणे, हास्यकल्लोळाच्या माध्यमातून रसिकांची करमणूक व क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जीवनावर टाकलेल्या प्रकाशझोतामुळे येळ्ळूरमधील मराठी साहित्य संमेलन उजळून निघाले. नेटके नियोजन व रसिकांची उपस्थिती लक्षवेधी ठरली. कोरोनामुळे यंदा संमेलने होणार नाहीत, अशी भीती व्यक्‍त होत होती. मात्र, संमेलन आयोजकांनी निर्धार केल्यानंतर सीमाभागात साधेपणाने संमेलने भरविली जात आहेत. आतापर्यंत झालेली सर्व संमेलने यशस्वी झाली आहेत. सीमाभागात अजूनही काही संमेलने होणार असून त्याचे नियोजन सुरू आहे.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीमुळे येळ्ळूरमध्येही यंदा छोट्या स्वरुपात संमेलन भरविण्यात आले. दरवर्षी मंडप घालून खुल्या जागेत संमेलन भरविले जाते. यंदा नेताजी मराठी सांस्कृतिक भवनात बंदिस्त संमेलन झाले. दरवर्षी मराठी सिनेसृष्टीतील कलाकार या संमेलनाचे प्रमुख आकर्षण असते. पण, यंदा गर्दी टाळण्यासाठी सिनेअभिनेत्यांना आमंत्रित करण्यात आले नाही. त्याऐवजी स्थानिकांना संधी देण्यात आली. त्याचे त्यांनी सोने केले.
दरवर्षी चार ते पाच सत्रात पार पडणारे साहित्य संमेलन यंदा फक्त दोन सत्रात झाले. दोन्ही सत्रे दर्जेदार झाली. तत्पूर्वी, जल्लोषात ग्रंथदिंडी निघाली.

हेही वाचा - युवतीच्या छेडछाडीवरून दोघांवर हल्ला; बेळगावातील घटना

पहिल्या सत्रात उद्‌घाटन व संमेलनाध्यक्षांचे भाषण झाले. संमेलनाध्यक्ष अनिल आजगावकर यांनी मोजक्‍याच शब्दाच अर्थपूर्ण विचार मांडले. दुसऱ्या सत्रात आजरा येथील प्रा. नवनाथ शिंदे यांनी क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या जीवनावर आधारीत एकपात्री प्रयोग सादर केला. तर कारदग्यातील प्रकाश काशीद यांनी सादर केलेल्या हास्यकल्लोळ कार्यक्रमाला रसिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. संमेलनाच्या व्यासपीठावरुन सामाजिक, साहित्यिक, पत्रकार, विद्यार्थी आदींना सन्मानित करण्याची परंपरा आयोजकांनी या वेळीही जपली. 

सीमाप्रश्‍नाचा ठराव

सीमाभागातील काही मराठी साहित्य संमेलनांच्या व्यासपीठावरुन सीमाप्रश्‍नाचा ठराव मांडला जातो. मात्र, गेल्या काही वर्षात प्रशासनाच्या भीतीने काही ठिकाणी असे ठराव मांडणे टाळले जाते. मात्र, दरवर्षीप्रमाणे यंदाही येळ्ळूर मराठी साहित्य संमेलनात सीमाप्रश्‍नाचा ठराव मांडण्यात आला. त्याला उपस्थितांनीही जल्लोषात अनुमोदन दिले.

संपादन - स्नेहल कदम