आंदोलन दिल्लीत आणि परिणाम बेळगावात ; रताळ्याची उचल झाली कमी

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 17 December 2020

अजून काही दिवस अशीच परिस्थिती राहिल्यास शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांनाही मोठा फटका बसणार आहे. 

बेळगाव : तीन कृषी कायदे रद्द करण्यासाठी राजधानी दिल्लीच्या सीमांवर सलग १९ दिवसांपासून शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाचा परिणाम बेळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीवर (एपीएमसी) झालेला आहे. बेळगावातून दिल्ली व हरियाणा परिसरात होणारी मालाची जावक ठप्प झाली आहे. अजून काही दिवस अशीच परिस्थिती राहिल्यास शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांनाही मोठा फटका बसणार आहे. 

एपीएमसीतून मोठ्या प्रमाणात रताळी परराज्यात जात असतात. सणासुदीच्या काळात त्यांना मोठी मागणी असते. एपीएमसीतून दिल्लीसह परिसरात सध्या फक्त रताळ्यांची जावक होत आहे. मात्र, त्यालाही शेतकरी आंदोलनाचा मोठा फटका बसला आहे. एपीएमसीत सध्या इंदूर व आग्रा बटाटा येत आहे. बेळगावातील स्थानिक बटाट्याचा हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. डिसेंबर अखेरपर्यंत बटाटा आवक संपुष्टात येण्याची शक्‍यता आहे.

हेही वाचा - चिपळुणात सुरु आहे शिक्षणाधिकारी पदाचा खेळखंडोबा -

दिल्ली सीमावर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. हे आंदोलन तीव्र झाल्यास मालाची उचल होणार नाही. याची भिती दिल्लीतील व्यापाऱ्यांना वाटत आहे. त्यामुळे तेथील व्यापारी बेळगावातून कमी प्रमाणात रताळ्याची उचल करत आहेत. एपीएमसीतून रोज दिल्लीसह परिसरात ६० टक्के मालाची जावक  होते. शिल्लक ४० टक्के बेळगाव व परिसरात जातो. मात्र, सध्या ही जावक कमी 
झाली आहे.

बुधवारच्या बाजारात रताळ्यांचा दर प्रतिक्विटल ७०० ते ८०० रुपये होता. ग्रामपंचायत निवडणुक असल्याने रताळ्यांची आवक कमी होत आहे. बुधवारी फक्त ४ हजार पिशव्यांची आवक झाली होती. गत आठवड्यात शनिवारी प्रतिक्विटल दर ६०० ते ७०० रुपये दर होता. यावेळेस तो १०० ते दोनशे रुपयांनी वाढला. बटाट्याचा दर प्रतिक्विटल ३ ते ४ हजार रुपये होता. बटाट्याची २००० पिशव्या आवक झाली.  

हेही वाचा - १०० शाळा बंदच ; रत्नागिरीत २६ हजार विद्यार्थी प्रत्यक्ष वर्गात -

कांदा दरात घट

बाजारात सध्या महाराष्ट्रातील नवीन कांदा दाखल झाला आहे. या कांद्याला प्रतिक्विटल २,५०० ते ३,५०० रुपये दर आहे. जुन्या कांद्याला प्रतिक्विटल २००० ते ३००० दर आहे. सफेद कांदा ५  ते ६ हजार रुपये भाव आहे. गत बाजाराच्या तुलनेत कांद्याचा दर ४०० ते ५०० रुपयांनी कमी झाला आहे. बेळगाव परिसरातील कांदा पुढील महिन्यात दाखल होणार आहे. यंदा कोरोना व पावसामुळे अपेक्षित कांदा बाजारात दाखल झालेला नाही.

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: the export of sweet potato decreased due to delhi farmers protest effect on belgaum market