facilities should be given to health system
facilities should be given to health system

आरोग्य व्यवस्थेलाच हवा सुविधांचा डोस

सांगली : सांगली, मिरज आणि कुपवाड या तीन शहरांची बनलेल्या महापालिकेची आरोग्य व्यवस्थाच सलाईनवर आहे. कोल्हापूरपेक्षा जास्त क्षेत्रफळ असलेल्या महापालिकेत आरोग्य सुविधा मात्र नगण्य आहेत. त्यामुळे खासगी हॉस्पिटलवरच जनतेला अवलंबून रहावे लागते. आरोग्य व्यवस्था सुधारण्यास मोठा वाव असून हा विभाग अत्याधुनिक करण्याची गरज आहे.

महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे प्रशासनाचे आणि कारभाऱ्यांचेही अक्षम्य दुर्लक्ष आहे. त्यामुळेच तीनही शहरात महापालिकेचे एकही मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल नाही. सांगली आणि मिरज या दोन शहरांकडे मेडिकल हब म्हणून पाहिले जात आहे. पण, महापालिकेला आपले एखादे सुसज्ज हॉस्पिटल असावे असे वाटत नाही. राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत शासनाने उभारलेले दहा रुग्णालये महापालिका क्षेत्रात आहेत. तर सांगली, मिरज आणि कुपवाड या मूळच्या नगरपालिकांच्या काळात असलेली आठ दवाखाने आहेत. पण, महापालिका स्थापन झाल्यापासून नवीन एकही हॉस्पिटल उभारण्यात आलेले नाही. 

आरोग्य विभागाचे तुकडे 
आरोग्य विभागाचे कार्यालय एक नंबर शाळेसमोरच्या महापालिकेच्या इमारतीत पहिल्या मजल्यावर आहे. मात्र या विभागाचे तुकडे करण्यात आले आहेत. घनकचरा व्यवस्थापन, शहरातील स्वच्छता आणि दवाखाने असे आरोग्य विभागाचे विभाजन केले आहे. मात्र एकूण स्टाफ रचना पाहता तोकड्या कर्मचाऱ्यांमध्ये हा विभाग चालवणे तसे जिकीरीचे आहे. पण, नवीन कर्मचारी भरती नसल्याने आहे त्या कर्मचाऱ्यांवर या विभागाचे काम चालू आहे. 

कम्युनिटी हेल्थ सेंटरमुळे दवाखाने वाढले 
महापालिकेने स्वत:चे दवाखाने वाढवण्याची गरज होती. पण, त्यांनी दुर्लक्ष केले आहे. मात्र शासनाच्या आरोग्य अभियानामुळे दहा कम्युनिटी हेल्थ सेंटर उभारले आहेत. त्यामुळे किमान प्रथमोपचाराची सोय या ठिकाणी झाली आहे. मात्र या एकाही ठिकाणी वैद्यकीय अधिकारी म्हणून एमबीबीएस झालेले डॉक्‍टर नाहीत. तर बीएएमएस डॉक्‍टरांकडेच ही जबाबदारी आहे. एमबीबीएस होणारा डॉक्‍टर पुढे पदव्युत्तरसाठीच प्रयत्न करतो. त्यामुळे आता फक्त एमबीबीएस डॉक्‍टर मिळणे अवघड आहे. त्यामुळे शासनानेच बीएएमएस डॉक्‍टरांकडे ही केंद्रे सोपवली आहेत. महापालिकेच्या अखत्यारित येणाऱ्या या रुग्णांलयांमध्ये नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळतो. पण किरकोळ आजारांसाठीच येथे उपचार केले जातात. त्यामुळे पुढील उपचारासाठी सिव्हील हॉस्पिटल किंवा खासगी रुग्णालयातच जावे लागते. हे चित्र बदलण्याची गरज आहे. 

किमान सुविधा मिळणे आवश्‍यक 
महापालिका आरोग्य विभागाकडे कारभाऱ्यांचीही डोळेझाक आहे. त्यामुळे कधी काळी नगरपालिका असताना खणभागातील डायग्नोस्टीक सेंटरमध्ये एक्‍स रे, सोनोग्राफी, किरकोळ शस्त्रक्रिया होत असत. आता त्याही बंद आहेत. त्यामुळे सावित्रीबाई फुले वसतीगृह सोडले तर महापालिकेच्या दवाखान्यांचा उपयोग फक्त सर्दी, खोकला, ताप यासारख्या आजारांसाठीच शिल्लक आहेत. त्यामुळे विविध तपासण्या, किरकोळ शस्त्रक्रिया यासारख्या किमान सुविधा मिळणे आवश्‍यक आहे. 

मल्टीस्पेशालिटीची गरज 
महापालिका क्षेत्रात सुमारे पाच लाख लोकसंख्या आहे. तीन शहरांचा समावेश आहे. हे लक्षात घेऊन एक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभारणे गरजेचे आहे. एमआरआय, सिटी स्कॅन, डायलिसीसी, डिजिटल सोनोग्राफीसारखी अत्याधुनिक यंत्रणा तेथे उभारली पाहिजे. तसेच अपेंडिक्‍स, हार्निया यासारख्या छोट्या शस्त्रक्रियांसाठी ऑपरेशन थिएटर उभारले पाहिजे. डे केअर सुविधा दिली पाहिजे. यामुळे महापालिका क्षेत्रातील नागरिकांना कमी खर्चात हे उपचार मिळाल्यास आरोग्यावरचा खर्च आटोक्‍यात राहील. 

महापालिकेचे आठ दवाखाने
महापालिका क्षेत्रात दहा आरसीएच सेंटर आहेत. तसेच महापालिकेचे आठ दवाखाने आहेत. रुग्णांना मोफत औषधोपचार, लसीकरण केले जाते. प्रसूतीगृहात गर्भवतींची मोफत सोनोग्राफी केली जाते. गरोदर मातांची तपासणी करुन औषधोपचार केले जातात. तसेच महापालिका क्षेत्रात पाच मायक्रोस्पिक केंद्र आहेत. तेथे क्षयरोग तपासणी करुन क्षयरुग्णांना मोफत औषधोपचार केले जातात. महापालिकेकडून जास्तीत जास्त आरोग्य सुविधा पुरवण्याचा प्रयत्न केला जातो. 
- डॉ. संजय कवठेकर, आरोग्य अधिकारी, महापालिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com