काय सांगता ! कापड विक्रेत्याकडे सापडल्या 97 हजारांच्या बनावट नोटा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 नोव्हेंबर 2019

दिवाळी आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर बनावट नोटा बाजारात आणून अर्थव्यवस्थेला धक्का पोचविण्याचा प्रयत्न करण्याऱ्या टोळीचा पर्दाफाश 17 ऑक्‍टोबरला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केला होता

कोल्हापूर - बनावट नोटा तयार करणाऱ्या इचलकरंजीतील टोळीतील आणखी एकाला गडहिंग्लज येथून पोलिसांनी ताब्यात घेतले. राहुल मारुती नेसरी (वय 30, रा. भडगाव, ता. गडहिंग्लज) असे त्या संशयित कापड विक्रेत्याचे नाव आहे. त्याच्याकडून 97 हजार रुपयांहून अधिकच्या बनावट नोटा जप्त केल्या. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ही कारवाई केली असून, त्याला इचलकरंजीतील शिवाजीनगर पोलिसांकडे वर्ग केल्याचे पोलिस निरीक्षक तानाजी सावंत यांनी सांगितले. 

सोशल मीडियावरील व्हिडिओ पाहून तयार केल्या नोटा

दिवाळी आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर बनावट नोटा बाजारात आणून अर्थव्यवस्थेला धक्का पोचविण्याचा प्रयत्न करण्याऱ्या टोळीचा पर्दाफाश 17 ऑक्‍टोबरला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केला होता. याप्रकरणी इचलकरंजीतील संशयित जीवन धोंडिबा वरुटेसह तिघांवर कारवाई केली होती. त्याच्याकडून 10 लाख एक हजाराच्या बनावट नोटा जप्त केल्या होत्या. प्राथमिक तपासात सोशल मीडियावरील व्हिडिओ पाहून या बनावट नोटाही टोळी तयार करत असल्याची माहिती पुढे आली होती. हा गुन्हा इचलकरंजी शिवाजीनगर पोलिसांकडे वर्ग केला होता. दरम्यान, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील पोलिस नाईक तुकाराम राजीगरे यांना भडगाव (ता. गडहिंग्लज) या गावातील कापड दुकानदार राहुल नेसरीकडे बनावट नोटा असल्याची माहिती मिळाली.

इचलकरंजीत खपवल्या नोटा

पोलिस निरीक्षक सावंत यांच्या मार्गदर्शनानुसार पथकाने गडहिंग्लज येथे सापळा रचून संशयित राहुलला ताब्यात घेतले. त्याच्या झडतीत पोलिसांना 97 हजार 800 रुपयांच्या बनावट नोटा मिळून आल्या. त्या पोलिसांनी जप्त केल्या. चौकशीत त्याचे गडहिंग्लज बस स्टॅंन्डजवळ कापडाचे दुकान असल्याची माहिती पुढे आली. त्याने बनावट नोटा इचलकंरजीतील संशयित जीवन वरुटे याने त्याला खपविण्यासाठी दिल्याचे पोलिसांना सांगितले. याबाबतचा तपास शिवाजीनगर पोलिस करीत आहेत. ही कारवाई पोलिस निरीक्षक तानाजी सावंत, सहायक पोलिस निरीक्षक संतोष पवार, पोलिस कर्मचारी तुकाराम राजगिरे, अमोल कोळेकर, संदीप कुंभार, पांडुरंग पाटील, सागर कांडगावे, जितेंद्र भोसले, संजय पडवळ, संतोष पाटील, सुरेश पवार यांनी केली. 

नोटाबाबत तपास सुरू... 
बनावट नोटा तयार करणाऱ्या तिघा जणांच्या टोळीचा पर्दाफाश होऊन महिना झाला. दरम्यान, पोलिसांनी ताब्यात घेतलेला संशयित राहुल नेसरी हा शेतीबरोबर कापडे दुकानचाही व्यवसाय करतो. त्याने या बनावट नोटा इचलकंरजीतील वरुटेकडून घेतल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. त्या नोटा किती होत्या, त्यातील किती नोटा राहुलने बाजारात खपविल्यात. आदींचा तपास सुरू असल्याचे निरीक्षक सावंत यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fake Currency Found At Textile Dealer In Kolhapur