केंद्रीय अबकारीत नियुक्तीची बनावट पत्रे: सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील युवक जाळ्यात

Fake Letters of Appointment in Central Excise: Sangli, Kolhapur District Youth in trap
Fake Letters of Appointment in Central Excise: Sangli, Kolhapur District Youth in trap

सांगली : केंद्रीय अबकारी विभागात (जीएसटी कार्यालय) नोकरी देण्याच्या नावाखाली बेरोजगार युवकांची फसवणूक होण्याचे प्रकार समोर आले आहेत. दिल्लीहून आलेले नियुक्तीपत्र घेऊन अशाच काही तरुणांनी मिरजेतील जी.एस.टी. कार्यालयात चौकशी केली असता हा प्रकार उघडकीस आला. सांगली, सातारा, कोल्हापूरचे युवक या बोगस नियुक्तीच्या जाळ्यात अडकल्याची शक्‍यता आहे. मात्र या प्रकरणी अद्याप कुणीही पोलिसांकडे तक्रार केली नसल्याचे समजते. जीएसटी कार्यालयाने वरिष्ठ कार्यालयांच्या निदर्शनास हा प्रकार आणला आहे. 

देशात बेरोजगारी प्रचंड वाढली आहे. त्यामुळे बेरोजगार युवकांना नोकरी देण्याच्या आमिषाने फसवणुकीचे प्रकारही घडत आहेत. त्यातच केंद्र सरकारच्या अबकारी विभागात नोकरी मिळणार या आशेने बेरोजगार युवक गळाला लागले आहेत. फिल्ड वितरण अधिकारी पदावर नियुक्ती देण्याचे आमिष या युवकांना देण्यात आले होते. त्यासाठी बेरोजगार युवकांना ऑनलाईनवरुन अर्ज देण्यास सांगितले होते. त्यातील काहींना नियुक्तीची पत्रे दिल्लीहून आली होती. त्यावरुन युवकांची फसवणूक करणारी टोळी दिल्लीतील असावी असा अंदाज आहे. शिवाय सांगलीत हा प्रकार उघडकीस आला असला तरी त्याची व्याप्ती नेमकी किती मोठी आहे ते अद्याप स्पष्ट झालेले नाही. 

दिल्लीहून आलेले नियुक्तीपत्र 20 ते 22 युवकांनी मिरजेतील केंद्रीय जी.एस.टी. कार्यालयात जाऊन चौकशी केली असता तशी काही भरती नसल्याची माहिती त्यांना मिळाली. केंद्रीय जी.एस.टी.च्या कोल्हापूर कार्यालयातही असे युवक चौकशीसाठी आल्याचे समजते. नोकरीचे नियुक्ती पत्र घेऊन तरुण आल्याने कार्यालयातील अधिकारी आश्‍चर्यचकीत झाले. त्यांनी या युवकांकडून या विभागातील अधिकाऱ्यांनी माहिती घेतली असता त्यातून ही धक्कादायक माहिती समोर आली. 

या युवकांना आलेल्या पत्रात त्यांना सरकारकडून केंद्रीय अबकारी विभागात फील्ड अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आल्याचे म्हटले आहे. त्यापोटी त्यांना वीस हजार मासिक वेतन तसेच पेट्रोल, वाहन खर्च, प्रॉव्हिडंड फंड, दुपारचे जेवण, घरभाडे, अपघात विमा असेही लाभ देण्यात येणार असल्याचेही पत्रात म्हटले आहे. त्यांना लवकरच दारूच्या दुकानावर नियुक्ती देण्यात येणार आहे. जी.एस.टी. कार्यालयातील अधिकाऱ्यांनी या पत्राची पडताळणी केली असता तपशीलांवरुन ही कागदपत्रे बनावट आहेत असे दिसून आले. तसेच त्यांना रजिस्ट्रेशन फी म्हणून 2200 रुपये भरण्यास सांगण्यात आले आहे. तसेच पंधरा हजार रुपये ठेवींसाठी देण्यास सांगितल्याचे या युवकांनी अधिकाऱ्यांना सांगितले. 

अनुदानाच्या नावाखाली फसवणूक 

बेरोजगारांना नोकरीचे आमिष दाखवून तसेच संस्थांना अनुदानाच्या नावाखाली फसवणुकीचे नवीन फंडे या निमित्ताने समोर येत आहेत. यापूर्वीही मिरज येथील काही व्यक्तींना बंगळुरू येथील संस्थेने आपणास अनुदान मिळणार असून यासंदर्भात जी.एस.टी. क्रमांक आवश्‍यक आहे. त्यासाठी 3 हजार 800 रुपये इतकी रक्कम तात्काळ पाठवणे आवश्‍यक आहे, असे सांगितले होते. संबंधित व्यक्तींनी केंद्रीय जी.एस.टी. कार्यालयात चौकशी केली असता सदर संस्थेचा बनाव उघडकीस आला होता. त्यामुळे अनेकांची फसवणूक टळली. 

सतर्क राहणे गरजेचे

केंद्रीय जी.एस.टी. विभाग अशा पद्धतीने कोणालाही नेमणुका देत नाही. अशा पद्धतीच्या पत्रांना प्रतिसाद दिल्यास उमेदवारांची फसवणूक होऊ शकते. जी.एस.टी. कार्यालयाने हा विषय वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवला आहे जेणेकरून विद्यार्थ्यांचे आर्थिक व मानसिक नुकसान होऊ नये. सध्याच्या काळात फसवणुकीचे अनेक फंडे समाजविघातक शक्ती काढत असून त्यासाठी सतर्क राहणे गरजेचे आहे. 

- राजेंद्र मेढेकर, वरिष्ठ निरीक्षक, केंद्रीय जी.एस.टी. विभाग 

संपादक : युवराज यादव 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com