esakal | सकाळ संवाद : मानसिक विकारावर मात करण्यासाठी कुटुंबाची साथ हवी
sakal

बोलून बातमी शोधा

Family support is needed to overcome mental disorders : Prof. Rohini tukdev

मानसिक विकार-उपचार आणि सभोवतालची परिस्थिती याबद्दल कांदबरीच्या लेखिका प्रा. रोहिणी तुकदेव यांनी "सकाळ संवाद' मध्ये मांडलेली भूमिका... 

सकाळ संवाद : मानसिक विकारावर मात करण्यासाठी कुटुंबाची साथ हवी

sakal_logo
By
जयसिंग कुंभार

आकार फाऊंडेशनच्यावतीने "थांगपत्ता' या कांदबरीचे नुकतेच प्रकाशन झाले. मनोविभ्रमावस्था विकारग्रस्त नायिका आणि तिची ससेहोलपट हे या कादंबरीचे कथाबीज. यानिमित्ताने मानसिक विकार-उपचार आणि सभोवतालची परिस्थिती याबद्दल कांदबरीच्या लेखिका प्रा. रोहिणी तुकदेव यांनी सांगलीत   "सकाळ संवाद' मध्ये मांडलेली भूमिका... 

प्रश्‍न ः "थांगपत्ता'चे कथाबीज थोडक्‍यात सांगा? 
प्रा. तुकदेव : ही कादंबरी मनोव्यापाराविषयी संबंधित आहे, मात्र यातील नायिका ज्या विचलित विभ्रमित मनोविकाराने त्रस्त आहे; त्या समस्येचं समाजातील प्रमाण 2 टक्के इतकेच आहे. हा विकार स्मृतिभ्रंशाचाच उपप्रकार. यातील नायिका जिम चालवणारी स्त्री आहे. तिला दहा वर्षांचा मुलगा व नोकरदार नवरा आहे. या नायिकेच्या मनावर असा काही आघात झालेला असतो, त्यातून ती अपमानित-भयभीत-लज्जीत अवस्थेत सतत वावरते. ती अवस्था इतरांनाच काय स्वतःलाही ती सांगू शकत नाही. त्यातून बाहेर पडणंही अवघड असतं. अशा अगतिकता, असुरक्षित, आयुष्यातून उठलेल्या स्त्रीच्या झुंजीची ही कथा आहे. इथे ती नशीब-दैवाच्या हवाल्यावर विसंबून न राहता ती या मनोविकाराची झुंजते. "स्व'साठी ती प्रयत्न करते. 

प्रश्‍न ः या निमित्ताने मानसिक विकार समस्येबद्दलची तुमची निरीक्षणे सांगा. 
प्रा. तुकदेव : 
वीस- पंचवीस वर्षांपूर्वीच्या स्थितीशी तुलना करता मानसिक विकाराचं प्रमाण धक्कादायक वाटावं इतकं वाढलंय. कधी ना कधी तणाव, नैराश्‍य, चिंतेनं गाठलंय अशाचं प्रमाण 80 टक्के इतकं आहे. त्यामुळे ही समस्या व्यापक आहे. अलीकडचा चांगला बदल म्हणजे लोकही ते मान्य करतात. ते डॉक्‍टरांकडे जायला तयार होतात; जे पूर्वी झाकून ठेवलं जायचं. या डॉक्‍टराकडं वाढलेली रुग्णसंख्या पुरशी बोलकी आहे. लोक औषधे घेतात; बरे होतात.

मात्र अडचण पुढे आहे. त्यांना पूर्णतः बरे होण्यासाठी आवश्‍यक असे वातावरण मात्र घरी कुटुंबात मिळत नाही. त्यांच्यासाठी डॉक्‍टर आणि कुटुंबाकडे द्यायला पुरेशा वेळच नाही. त्यामुळे विकार पुन्हा पलटी मारतो. त्यांना हाताळण्यासाठी आधार व्यवस्था नाहीत. "आकार'चे आम्ही केंद्र सुरू केले, तेव्हा सर्वच मानसोपचार तज्ज्ञ-डॉक्‍टरांना त्यांच्या कामासाठी पूरक अशी ती गोष्ट वाटली. अशी केंद्रे मोठ्या शहरांमध्ये आहेत. ग्रामीण भागात अशा व्यवस्थाच नाहीत. 

प्रश्‍न ः मानसिक विकार वाढत आहेत. त्याला आजूबाजूची स्थिती कशी पूरक ठरतेय? 
प्रा. तुकदेव ः
खरंय. याकडे अगदीच मूलभूत दृष्टीनं पहायचं तर आपल्याकडे या समस्येच्या मुळाशी अनेक पदर आहेत. अमर्त्य सेन यांच्यासारख्या अर्थशास्त्रींनी त्याचा संबंध दारिद्य्राशी जोडला आहे. आरोग्य सेवा, शिक्षण, आर्थिक स्वातंत्र्य या बाबतीत लिंगाधिष्ठित विषमतेशीही तो संबंध जोडला आहे. याआधी दैववादी मानसिकता आणि त्यातून फोफावणाऱ्या अंधश्रद्धा आहेतच. प्रश्‍नांना भिडण्यासाठी धाडसाअभावी मग बुवा-महाराजांकडं माणसं वळतात. ते कमी की काय म्हणून पुन्हा टीव्ही मालिका- प्रसार माध्यमांचा दैववादी मानसिकता घडवणाऱ्या कार्यक्रमांचा रतीब. विवेकवादी विचाराचा समाज शिक्षण प्रसाराने घडेल, हा समजही आता फोल ठरला आहे.

आपण काय शिकवलं? पालक, शिक्षक, शाळा-महाविद्यालये अशा अनेक पातळ्यांवर आपल्याला या समस्येला भिडण्यासाठी कोणतीही तडजोड न लकरता प्रयत्न केले पाहिजेत. आपली धोरणं चांगलीच आहेत. मात्र प्रत्यक्ष अंमलबजावणीतील अंतर खूप मोठे आहे. एक सबळ समाज निर्माणासाठी आपल्याला शिक्षण आणि या प्रक्रियेतील घटक यांच्या निवडीपर्यंत ठोस भूमिका घ्यावी लागेल. 

संपादन : युवराज यादव