
ट्रॅक्टरने जाऊ देण्यास मज्जाव; संतप्त शेतकऱ्यांचे चन्नम्मा चौकात आंदोलन
बेळगाव : दिल्लीत सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बंगळुरात मंगळवारी (ता. २६) किसान मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यात सहभागी होण्यासाठी बेळगाव परिसरातील हजारो शेतकरी आज ट्रॅक्टर, टेम्पो व इतर वाहनांनी बंगळूरला रवाना होणार होते. मात्र, पोलिसांनी घोटगेरी, पाच्छापूर व इतर भागातून येणारे ट्रॅक्टर अडविल्याने संतप्त शेतकऱ्यांनी चन्नम्मा चौकात जोरदार निर्दशने केली.
केंद्र सरकारने लागू केलेले शेतकरीविरोधी कायदे रद्द करावेत, अशी मागणी करीत २६ नोव्हेंबरपासून पंजाब, हरियाना व दिल्लीतील शेतकऱ्यांनी दिल्लीत आंदोलन सुरू केले आहे. मात्र, केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्यांची अद्याप दखल घेतलेली नाही. त्यामुळे, प्रजासत्ताक दिनी शेतकरी दिल्लीत ट्रॅक्टरसह किसान मोर्चा काढणार आहेत. त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यातील विविध शेतकरी संघटनांनी बंगळुरात मंगळवारीच किसान मोर्चाचे आयोजन केले आहे. त्यात सहभागी होण्यासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांची पोलिसांनी अडवणूक केली. त्यामुळे, विविध भागांतून ट्रॅक्टर व अन्य वाहनांतून आलेल्या शेतकऱ्यांना बंगळूरला जाता आले नाही.
हेही वाचा- सरळसेवा पदभरती प्रक्रियेसाठी अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची न्यूज
पोलिसांच्या दडपशाहीचा निषेध करण्यासाठी सकाळपासूनच शेतकरी चन्नम्म्मा चौकात जमा झाले होते. त्यांनी निदर्शने व हलगीवादन करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तसेच, केंद्र सरकारने लागू केलेले शेतकरीविरोधी कायदे रद्द करावेत अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला. शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे या भागात मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.
आंदोलनात कर्नाटक राज्य रयत संघटनेचे संचालक गणेश ईळीगेर, कित्तूर तालुकाध्यक्ष कुबेर गाणगेर, राजू मरवे, कृषक समाज राज्याध्यक्ष सिध्दगौडा मोदगी, माजी महापौर नागेश सातेरी, शिवाजी कागणीकर, परीमळा मिसाळे, प्रकाश नायक, संगीता गुरन्नावर, बबन मालाई यांच्यासह इतर शेतकरी सहभागी
झाले होते.
उद्या रेल्वेने जाणार
ट्रॅक्टरमधून बंगळूरला जाणाऱ्या शेतकऱ्यांची पोलिसांनी अडवणूक केली असली, तरी सोमवारी (ता. २५) शेतकरी रेल्वेने बंगळूरला रवाना होणार आहेत. त्यासाठी रेल्वेला अधिक डबे जोडण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच, मंगळवारी (ता. २६) शेतकऱ्यांची ताकद सरकारला दिसून येईल, असा इशारा शेतकरी संघटनांनी दिला आहे.
संपादन- अर्चना बनगे