गवताचा भारा आणण्यासाठी शेतकऱ्याने लढवली ही शक्कल (व्हिडिओ)

अशोक तोरस्कर
बुधवार, 30 ऑक्टोबर 2019

बैलगाडी जाऊ शकत नाही. पायी चालत जाण्याशिवाय पर्याय नाही. यामुळे या कामासाठी घरातील सर्वांना मेहनत घ्यावी लागत होती. यावर काहीतरी उपाय केला पाहिजे म्हणून उदय यांनी गवतासाठी मिनी ट्रेन तयार करण्याचा निर्णय घेतला.

उत्तूर ( कोल्हापूर ) - चिमणे (ता. आजरा) येथील प्रगतिशील शेतकरी उदय महादेव नादवडेकर (वय३०) यांनी शेतातील गवताचा भारा आणण्यासाठी मिनी रेल्वे तयार केली आहे. विशेष म्हणजे ती टाकावू वस्तूपासून बनवली आहे. यासाठी त्याला ४० हजार इतका खर्च आला. 

रेल्वे ३०० मीटर ( ९००फूट ) अंतर एक मिनीट ४० सेंकदात पार करते. गावाबाहेरील शेतात नादवडेकरांची शेती आहे. तेथे त्यांचे वडील महादेव नादवडेकर यांनी २५ जनावारांचा मुक्त गोठा तयार केला. जनावारांच्या ओल्या चाऱ्यासाठी तीन एकर क्षेत्रात संकरित ( हत्ती ) गवताची लागवड केली. गोठ्यात सध्या १७ गायी व ४ म्हशी आहेत. त्यांना ५० किलो ओले गवत लागते. गवत कापून आणण्यासाठी चार माणसांना अर्धा दिवस लागायचा. गोठा उंचावर व गवताची शेती ५० फूट खाली असल्याने डोक्‍यावरून गवत आणताना दमछाक व्हायची.

बैलगाडी जाऊ शकत नाही. पायी चालत जाण्याशिवाय पर्याय नाही. यामुळे या कामासाठी घरातील सर्वांना मेहनत घ्यावी लागत होती. यावर काहीतरी उपाय केला पाहिजे म्हणून उदय यांनी गवतासाठी मिनी ट्रेन तयार करण्याचा निर्णय घेतला. याचा स्वतःच आराखडा तयार केला. फॅब्रिकेशन करणाऱ्या व्यक्तीकडे खर्चाची विचारणा केली. त्याने चार लाख रुपये खर्च सांगितला. तो आवाक्‍याबाहेर असल्याने स्वतःच ट्रेन तयार करण्याचा निर्णय घेतला. 

जुन्या बाजारातून विहिरीचा गाळ काढणारे डिझेल इंजिन खरेदी केले. तीनशे मीटर लोखंडी पाईप टाकून लोखंडी ट्रॉली तयार केली. ती लोखंडी रोपाच्या साहाय्याने इंजिनला जोडून त्याची चाचणी घेतली. सुरवातीला रिकामी व त्यानंतर  ५० किलो गवत ठेवून पुन्हा चाचणी घेतली. उदय यांचा हा प्रयोग यशस्वी झाला. या ट्रेनवरून ५०० किलो वजन नेता येत आहे. पीक काढणीच्या दिवसात धान्याची पोती आणणे शक्‍य होणार आहे. ३०० मीटर गवत आणण्यासाठी फक्त ५ रुपयांचे डिझेल खर्च होते.

ओले गवत आणण्यासाठी दुसरा पर्याय नसल्याने डोक्‍यावरून आणावे लागत होते. सखल भागातून उंचीवर असलेल्या गोठ्यापर्यंत येताना घरातील सर्वांना त्रास व्हायचा, मात्र हा प्रयोग यशस्वी झाला. आता वेळ आणि त्रासही कमी झाला.
- उदय नादवडेकर,
शेतकरी, चिमणे

उदय यांचा फॅब्रिकेशनचा कोणताही कोर्स झालेला नाही. बुद्धिमत्तेच्या जोरावर त्यांनी हा प्रयोग यशस्वी करून दाखवला आहे. यासाठी मित्र सचिन शिंदे, आई-वडील व पत्नीचे सहकार्य लाभल्याचे त्यांनी सांगितले.

रोज १०० लिटर दूध उत्पादन

उदय यांनी दहावीनंतर दोन वर्षाचा दुग्ध व्यवसायाचा कोर्स केला. वडिलांनी सुरू केलेला गायींचा गोठा पुढे नेटाने चालवला. दररोज त्यांना १०० लिटर दुधाचे उत्पादन मिळते. गोठ्यातील शेणखत पाईपद्वारे शेतातील पिकांना व गवताला सोडले आहे. यामुळे वेगळे खत देण्याची गरज भासत नाही. नोकरीच्या मागे न लागता शेतीपूरक व्यवसायातून चांगले उत्पन्न मिळू शकते, हे त्यांनी कृतीतून दाखवले आहे. त्यांचा आदर्श युवकांनी घेण्यासारखा आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmer Built Mini Train To fetch Fodder For Domestic Animals