जनावरे उपाशी मरत असल्याने शेतकऱ्याची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 3 ऑगस्ट 2019

- चारा छावणीच्या मागणीकडे प्रशासनाने सातत्याने दुर्लक्ष 
- गोठ्यातील जनावरे उपाशी मरत असल्याचे पहावले नसल्याने शेतकऱ्याची आत्महत्या 
- जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंत्यविधीची मागणी शिवसैनिकांची भुमिका
- चारा छावणीचा बळी गेल्याचा दावा

नगर : चारा छावणीच्या मागणीकडे प्रशासनाने सातत्याने दुर्लक्ष केले. त्यात गोठ्यातील जनावरे उपाशी मरत असल्याचे पहावले नसल्याने घोसपुरी (ता. नगर) येथील वसंत सदाशिव झरेकर (वय 49) या शेतकऱ्याने विष पिऊन आत्महत्या केली. काल मध्यरात्रीनंतर ही घटना घडली. हा प्रकार आज पहाटे उघडकीस आला. 
नातेवाईकांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. 

दरम्यान, झरेकर यांच्या निधनाचे वृत्त समजल्याने सकाळपासून नगर तालुक्‍यातील सर्वपक्षीय कार्यकर्ते जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल होत आहेत. झरेकर यांचा मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांनी घेतली आहे. 

मृतदेह ताब्यात घेण्यासाठी प्रशासनाने दबाव आणल्यास झरेकर यांच्या मृतदेहावर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात अंत्यविधी केला जाईल, असा इशारही त्यांनी दिला आहे. त्यामुळे जिल्हा शासकीय रुग्णालय व जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. 

या संदर्भात 'सकाळ'शी बोलताना कार्ले म्हणाले, "चारा छावण्यांसाठी नगर तालुक्‍यातील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरु केलेले आहे. त्या आंदोलनात मयत शेतकरी झरेकर देखील आघाडीवर होते. पोलिसांनी माझ्यासह आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्यांना अटक केली. त्या वेळी झरेकर यांनी स्वत:च्या अंगावरील कपडे फाडून या घटनेचा तीव्र निषेध केला होता. झरेकर यांच्याकडे पाच जनावरे आहेत. मात्र, चाराच शिल्लक राहिलेला नसल्याने ते जनावरांची भूक भागवू शकले नाहीत. त्यामुळे तीन दिवसांपूर्वी छावण्या सुरु न झाल्यास आत्महत्या करावी लागेल, असे ते मला म्हणाले होते. त्यामुळे झरेकर यांची आत्महत्या केवळ चारा छावण्या सुरु न झाल्यानेच झाली आहे. हा प्रशासनाच्या दुर्लक्षाचा परिणाम आहे.'' 

चारा छावण्यांसाठी मंगळवारी (ता. 30) नगर तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी 'रास्ता रोको' आंदोलन केले होते. त्या वेळी आंदोलकांना कोतवाली पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतरही आंदोलकांनी नगर येथील तहसील कार्यालयासमोर ठिय्या दिला. प्रश्‍न न सुटल्यास सामूहिक विषप्राशन करण्याचा इशाराही त्यांनी दिला होता. पावसाअभावी नगर तालुक्‍यातील बहुतांश भागात चाऱ्याचा गंभीर प्रश्‍न निर्माण झालेला आहे. तरीही प्रशासनाने छावण्या बंद केल्याने शेतकऱ्यांच्या भावना तीव्र आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर हे आंदोलन केले जात असल्याची भूमिका शेतकऱ्यांनी मांडली होती. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmer commits suicide due to Government ignored the demand for fodder camp