चार हजारांवर शेतकऱ्यांना फटका; अनुदान बंदच

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 11 February 2021

युरोपमधील देशात निर्यातीसाठी सांगली जिल्ह्यातील चार हजार २११ शेतकऱ्यांची नोंदणी झाली असून, दोन हजार २६७ हेक्‍टर क्षेत्रावरील द्राक्ष निर्यात होणार आहे.

सांगली :  केंद्र सरकारने द्राक्ष निर्यातीसाठी प्रति कंटेनर मिळणारे दीड लाख रुपये अनुदान बंद केल्याचा फटका जिल्ह्यातील चार हजार २११ शेतकऱ्यांना बसणार आहे. केंद्र सरकारने अनुदान बंदी आणि डिझेलच्या दरातील वाढीमुळे वाहतूक खर्च वाढला. बांगलादेशात गेले दहा दिवस बंद असलेली निर्यात पुन्हा सुरू झाल्याने उत्पादकांना दिलासा मिळाला. थंडीमुळे देशांतर्गत बाजारातही मागणी घटल्याचा दरावर परिणाम झाला आहे. 

युरोपमधील देशात निर्यातीसाठी सांगली जिल्ह्यातील चार हजार २११ शेतकऱ्यांची नोंदणी झाली असून, दोन हजार २६७ हेक्‍टर क्षेत्रावरील द्राक्ष निर्यात होणार आहे. केंद्र सरकारने यंदा द्राक्ष निर्यातीसाठी प्रतिकंटेनर मिळणारे दीड लाख रुपये अनुदान बंद केले.

हेही वाचा- पेट्रोल-डिझेल होणार आता शंभर रुपये लिटर ; दर राहणार चढेच

शिवाय, डिझेलची दरवाढ आणि महागाई वाढल्याने निर्यातदार व्यापाऱ्यांनी कमी किमतीला द्राक्षांची खरेदी सुरू केली आहे. सर्वसाधारण युरोप निर्यातीसाठी द्राक्षाला किमान प्रतिकिलो १०० ते १२५ रुपये दर अपेक्षित असतो. आखाती देशात सर्वसाधारण ६० ते ८५ रुपये दर अपेक्षित असतात. मात्र, तेवढा दर मिळत नसल्याने उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसला आहे.  

चार हजारांवर शेतकऱ्यांना फटका

जिल्ह्यात ५ ते २१ ऑक्‍टोबर या काळात मोठ्या प्रमाणात द्राक्ष पिकांच्या फळछाटण्या झालेल्या असल्याने येणाऱ्या १५ दिवसांत चांगला माल विक्रीसाठी बाजारपेठांत दाखल होणार आहे. जिल्ह्यात युरोप, आखाती देशांसह बांगलादेश, सौदी, ओमाण, दुबईसाठी द्राक्ष खरेदी करणारे व्यापारी दाखल झालेले आहेत. 

संपादन- अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: farmer grapes subsidy closed agriculture farming marathi news