esakal | VIDEO : या शेतकऱ्याने गुगललाच लावलं कामाला...मग काय पैसाच पैसा
sakal

बोलून बातमी शोधा

This farmer has put Google into work

सध्या राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने लॉक डाउन केलेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीमाल विक्रीसाठी अडचणी निर्माण होत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. यातच काही शेतकरी नवनवीन संकल्पना घेवून थेट विक्रीसाठी पुढाकार घेत आहे. भेंडे येथील शेतकऱ्यालाही शेतमाल विक्रीसाठी अडचणी आल्या होत्या. परंतु त्याने अवलंबलेले विक्री तंत्र भारीच ठरलं.

VIDEO : या शेतकऱ्याने गुगललाच लावलं कामाला...मग काय पैसाच पैसा

sakal_logo
By
सुनील गर्जे

नेवासे : शेतकऱ्याला पिकवता येतं पण विकता येत नाही. त्यामुळेच त्याचा माल स्वस्तात कोणीही लुबाडतं. हे विश्लेषण बऱ्याचं अंशी खरंही आहे. शेतकऱ्याने नवीन तंत्रज्ञानाची कास धरली पाहिजे असाही सल्ला उठता बसता दिला जातो. मात्र, नेवाशाच्या शेतकऱ्याने खरंच नव्या तंत्राचा वापर केला आणि फेसबुक, गुलललाच कामाला लावलं. आणि मग काय त्यांनी ऑनलाईन ग्राहक मिळवून दिला.एकदा उठाव मिळाल्यावर माल कशाचा राहतोय शेतात.

वाहतुकीला अडचणी, बाजारात होणारी लूट, मालाला मिळणारे कमी दर आशा विविध बाबी लक्षात घेवून भेंडे येथील डॉ. ईश्वर उगले यांनी  व्हॉट्स अॅप, फेसबुक, मोबाईल अशा विविध माध्यमाचा कलिंगड विक्रीसाठी वापर केला. गुललवर शेताचे लोकेशन शेअर केले. तेथे इत्थंभूत माहितीही दिली.

हेही वाचा - व्हिडिओ, क्वॉरंटाइनची बातमी दिली म्हणून पत्रकारावर हल्ला

गेल्या पंधरा दिवसांपासून शेतकरी ते ग्राहक अशी संकल्पना राबवून डॉ. उगले यांनी शेतातूनच थेट ग्राहकांना विक्री सुरू केली आहे. आतापर्यंत ५५ टन कलिंगड विक्री केली. त्यातून साधारणपणे त्यांना सुमारे सव्वापाच लाखांचे उत्पादन मिळाले. त्यांनी सुरू केलेला उपक्रम तालुक्यातील इतर शेतकर्‍यांना प्रेरणा देणारा ठरत आहे.

सध्या राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने लॉक डाउन केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीमाल विक्रीसाठी अडचणी निर्माण होत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. यातच काही शेतकरी नवनवीन संकल्पना घेवून थेट विक्रीसाठी पुढाकार घेत आहे. भेंडे येथील डॉ. उगले यांनाही शेतमाल विक्रीसाठी अडचणी आल्या होत्या. त्यांच्याकडे दोन एकर कलिंगडाचे पीक उभे होते. मात्र, कोरोनामुळे कलिंगड विक्रीचा प्रश्न त्यांच्यापुढे उभा राहिला, त्यामुळे त्यांनी व त्यांचे बंधू संदीप यांनी गुगलचा आधार घेतला. सोशल मीडियावरही जाहिरात केली. 

या जाहिरातीमध्ये कलिंगडाचे एकूण क्षेत्र, कलिंगडाचा प्रकार, वाण, चव, दर आणि विक्री-खरेदी करतांना घ्यावयाची काळजी अशा बाबी नमूद केल्या. जाहिरात केल्यानंतर एक-दोन दिवसांमध्ये ही जाहिरात दहा ते वीस हजार ग्राहकांपर्यंत गेली. आणि ग्राहकांनी त्याला चांगला प्रतिसाद देत खरेदी करण्यासाठी संपर्क करण्यास सुरुवात केली.

सुरुवातीपासूनच ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याने शेतातूनच कलिंगडाची थेट विक्री सुरू केली. गेल्या पंधरा दिवसांत त्यांनी पंच्चावन्न टन कलिंगडाची थेट विक्री केली. 


विक्री करतांना सोशल डिस्टन्सिंग 
उगले यांनी आपल्या शेताचे फोटो गुगलवर टाकले आणि तेथेच जाहिरात केली. आपल्याला जे कलिंगड हवे आहे, ते स्वतःच शेतात जाऊन तोडायचे आणि घरी घेऊन जायचे. विक्रीतील हा अभिनव प्रयोग लोकांना चांगलाच भावला. लोकांनी थेट त्यांचे शेत गाठले. आपल्याला हवा तो माल खरेदी केला. मास्क लावूनच खरेदी करण्याचे बंधन केले होते. पैसे कलिंगड घेतांना व देतांना सॅनिटायझरचा वापर केला. शेतात योग्य अंतर ठेवून ग्राहकांना कलिंगडाची विक्री करण्यात केली. 

प्रशांत पाटील गडाखांची संकल्पना 
डॉ. ईश्वर उगले हे तालुक्यात गडाख समर्थ म्हणून ओळखले जातात. विधानसभा निवडणूक दरम्यान सोशल मीडियावर मंत्री शंकरराव गडाखांचा प्रचार करतांना आघाडीवर होते. त्या दरम्यान तालुक्यात सोशल मीडियाच्या माध्यमातून सुमारे अकराशे व्हॉट्स अॅप ग्रुपला जोडले गेले. त्यांच्या दोन फेसबुकवर खात्यावर सुमारे दहा हजार फ्रेंडस जोडलेले गेले आहेत.

कोरोना पार्श्वभूमीवर लॉक डाउनची घोषणा झाली. या दरम्यान विक्रीच्या चिंतेत असलेले डॉ. उगले यांनी नेहमीप्रमाणे यशवंत सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष युवा नेते प्रशांत पाटील गडाख यांच्याशी राजकीय, सामाजिक व कोरोनाविषयावर चर्चा चालली असता उगले यांनी कलिंगड विक्रीची समस्याही त्यांना सांगितली. त्याच वेळी गडाख यांनी त्यांना शेतकरी ते ग्राहक ही संकल्पना सांगत शेतातच शासनाच्या आदेशाचे उल्लंघन होऊ न देता विक्री व्यवस्था करण्याचा व सोशल मीडियासह गुलल प्लॅटफॉर्म वापरण्याचा सल्ला दिला.

सोशल मीडियामध्ये हातखंडा असलेले डॉ. उगले यांनी लागलीच स्वतःच्या दोन्हीही फेसबुक खात्यासह सुमारे अकराशे व्हॉट्सअप ग्रुपवर कलिंगड विक्रीची जाहिरात कोरोंनाच्या पार्श्वभूमीवर अटी व नियमांसह व्हायरल केली. आणि बघता बघता ग्राहकच कलिंगड खरेदीसाठी शेतात आले. त्यामुळे डॉ. उगले हे ही युवा नेते प्रशांत गडाखांची संकल्पना असल्याचे आठवणीने सांगतात.  

``दीड-दोन महिन्यांपूर्वी दोन एकरावर कालिंगडाची लागवड केली होती. लागवड करतांना विषमुक्त शेती पद्धतीचा अवलंब केला. पंधरा दिवसांपूर्वी कलिंगड काढणीला आली होती. मात्र कोरोनामुळे अचानक वाहतूक, आठवडे बाजार, बाजार समित्या बंद झाल्याने विक्रीचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. यावर मात करण्याचा निर्णय घेवून गुगल, फेसबुकचा वापर करून थेट विक्री सुरू केली. त्यामुळे माझे होणारे नुकसान टळून सुमारे सव्वापाच लाखांचे उत्पादन मिळाले.
-डॉ. ईश्वर उगले, कलिंगड उत्पादक, शेतकरी.