सोयाबीनचे चांगले उत्पादन घायचे आहे? अशी करा बीजप्रक्रिया

सोयाबीनचे चांगले उत्पादन घायचे आहे? अशी करा बीजप्रक्रिया

सांगली : सांगली, सातारा, कोल्हापूर (Sangli, Satara, Kolhapur)जिल्ह्यात खरिपात सोयाबीनची लागवड केली जाते. नगदी म्हणून सोयाबीन शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरलेय. १०-१५ वर्षात सोयाबीनवर तांबेरामुळे उत्पादनात घट येत होती. कसबे डिग्रजच्या कृषी संशोधन केंद्रात संशोधन सुरू होते. त्याचा फायदा शेतकऱ्यांना मिळाला. सोयाबीनला सात-आठ हजार क्विंटल दर मिळत आहे. अनेक शेतकरी सोयाबीन घेण्याच्या तयारीत आहेत. या संदर्भात ‘केडीएस ७२६’(KDS726)चे पैदासकार महात्मा फुले कृषी विद्यापीठ (राहुरी) अंतर्गत कसबे डिग्रज कृषी केंद्रातील संशोधक डॉ. मिलिंद देशमुख यांच्याशी झालेला संवाद.(farmer-Soybean-cultivation-tips-sangli-marathi-news)

प्रश्न ः कसबे डिग्रज संशोधन केंद्रात सोयाबीनवरील संशोधनाबाबत काय सांगाल?

डॉ. देशमुख ः सोयाबीन जे एस ३३५, ९३०५ या वाणाच्या जाती १०-१५ वर्षात लागवडीखाली आल्या. सोयाबीन तांबेराला लवकर बळी पडते. त्यावर कसबे डिग्रज येथे १९९५ पासून संशोधन सुरू होते. सन २००८ मध्ये फुले कल्याणी डीएस २२८, सन २०१५ मध्ये फुले अग्रणी, सन २०१९ मध्ये केडीएस ७२६, फुले किमया केडीएस ७५३ वाण विकसित करण्यात आले. राज्यभर त्यांना पसंती मिळाली. पैकी केडीएस ७२६ सांगली भागात लोकप्रिय आहे.

प्रश्न ः केडीएस ७२६ ची वैशिष्ट्ये काय?

डॉ. देशमुख ः दाणा टपोरा आहे. वाण तांबेरा प्रतिकारक आहे. एखाद्याला तांबेरा प्रतिबंधक फवारणी शक्य नसली तरी तांबेरा नाही येत. चांगली लागवड केल्यास एकरी १८ ते २० क्विंटल उत्पन्न मिळते.

प्रश्न ः पेरणी आधी काय काळजी घ्यावी?

डॉ. देशमुख ः पेरणी, टोकणीपूर्वी थायरम, बाविस्टीन ट्रायकोडर्मा प्रति किलो चार ग्रॅम प्रमाणात बियाणांस लावावे. रायझोबियम लावावे बियाणे सावलीत वाळवावे. खोडमाशी ॲलोमोझायकचा प्रादुर्भाव बीजप्रक्रियेमुळे होत नाही. उत्पादन वाढीतील तो महत्त्वाचा घटक आहे.

प्रश्न ः उगवणक्षमता कशी तपासावी?

डॉ. देशमुख ः वाणाचे आवरण पातळ असते. घर्षणाने बियाणे बाद होण्याचा धोका असतो. पेरणी करणार त्या बियाणातील शंभर बिया ओल्या बारदानात गुंडाळा. परसबागेत बी टोकावे. उगवणक्षमता तपासावी. ७० बिया उगवल्या तर पेरणी करावी.

प्रश्न ः पेरणी केव्हा व कशी करावी?

डॉ. देशमुख ः जूनच्या सुरवातीला पावसाळी वातावरण झाल्यानंतर पेरणी, टोकणी करावी. दोन ओळीतील अंतर ४५ सें.मी., तर रोपांतील अंतर १५ सें.मी. असावे. अलीकडे दोन बाय एक अशी नवीन पद्धत अवलंबली जात आहे. तीही चांगली आहे.

प्रश्न ः लागवड व्यवस्थापन कसे असावे?

डॉ. देशमुख ः पेरणीवेळी खते देणे योग्य असते. उगवण झाल्यानंतर दिलेली खते पिकाला लागू होत नाहीत. ५०:७५:४५ असे एनपीकेचे प्रमाण आहे. एकरी १५ ते २० किलो युरिया, १७५ किलो सुपर फॉस्फेट, २० किलो पोटॅश वापरावे.

प्रश्न ः कीड रोगाचे व्यवस्थापन कसे करावे?

डॉ. देशमुख ः पाने खाणाऱ्या अळीचा मोठा धोका सोयाबीनला असतो. कृषी विद्यापीठाने शिफारस केलेल्या कीडनाशक व बुरशीनाशकांचा वापर करावा. पिकाच्या परिस्थितीची छायाचित्रे व्हाट्सअपवर देऊन कृषी विभागाचा सल्ला घ्या.

प्रश्न ः तणांचा बंदोबस्त कसा करावा?

डॉ. देशमुख ः पेरणी किंवा टोकणीनंतर २४ तासांत तणनाशकाची फवारणी करावी. पुरेशी ओल असेल हे पहायला हवे. उगवणीनंतर २१ दिवसांपर्यंत दोन सरीत तणनाशक फवारता येते. तणनाशकाची योग्य वेळ साधल्यास भांगलण खर्च कमी येतो.

प्रश्न ः आंतरपीक कसे घ्यावे ?

डॉ. देशमुख ः उसात सोयाबीनचे आंतरपीक घेताना दोन पद्धतीने घेता येते. मेअखेर सरीच्या दोन्ही बाजूला सोयाबीन टोकल्यानंतर ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये पाने पिवळी पडतात. त्यावेळी ऊस लावण करावी.

प्रश्न ः पाणी व्यवस्थापन कसे करावे?

डॉ. देशमुख ः खरीप सोयाबीनला पावसामुळे जास्त पाणी लागत नाही. पाऊस लांबल्यास जमिनीच्या वाफसा कंडिशनवर पाणी द्यावे. १०० ते ११५ दिवसांनी पीक काढणी योग्य होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com