लोकप्रतिनिधींच्या निवासस्थानापुढे शेतकरी का करत आहेत आंदोलन?

महेश काशीद
Thursday, 6 August 2020

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापुढे शेतकरी आंदोलन करणार आहेत. 

बेळगाव : भूसुधारणा कायदा आणि एपीएमसी दुरुस्ती कायद्याला विरोध दर्शविण्यासाठी येत्या 12 ते 14 ऑगस्ट दरम्यान लोकप्रतिनिधींच्या निवासस्थानापुढे आंदोलन करणार असल्याची माहिती आज शेतकरी संघटनेचे नेते चुनाप्पा पुजारी यांनी दिली. तसेच 15 ऑगस्ट रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापुढे आंदोलन करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालय येथे आज शेतकरी जमले होते. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या लढ्याची पुढील दिशा आणि त्याचे स्वरुप याची माहिती दिली. राज्य आणि केंद्राच्या धोरणांना शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला. केंद्र आणि राज्य सरकार शेतकरी विरोधी भूमिका घेत आहेत. त्याचे प्रतिनिधीक उदाहरण म्हणजे भूसुधारणा कायदा आणि एपीएमसी दुरुस्ती कायदा आहे.

हेही वाचा - बेळगाव : लाच घेताना बील कलेक्टर लाचलुचपतच्या जाळ्यात...

शेतकऱ्यांच्या सुपीक जमीन काढून घेऊन त्या कार्पोरेट कंपन्यांच्या घशामध्ये घालण्याचे नियोजनबध्द षडयंत्र सुरु आहे. हा कायदा शेतकरी विरोधी आहे. कार्पोरेट कंपन्या आणि लोकप्रतिनिधींना अनुकूलतेसाठी कायदा आणला जात आहे. शेतकऱ्यांवर अन्याय करण्याचा प्रयत्न सुरु आहे. शेतकरी विरोधी भुमिकेला आक्षेप घेत त्याविरोधात लोकशाही पध्दतीने लढा देण्याचे ठरविले आहे, अशी माहिती पुजारी यांनी दिली. 

पुढे ते म्हणाले, शेतकऱ्यांच्या आंदोलनाला 12 ऑगस्टला सुरवात होईल. पहिल्या दिवशी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांच्या निवासस्थानापुढे शेतकरी आंदोलन करतील. 13 ऑगस्टला पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांच्या निवासस्थाना समोर आणि 14 ऑगस्टला केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री सुरेश अंगडी यांच्या निवासस्थापुढे आंदोलन केले जाईल.

हेही वाचा - कोल्हापुरात एनडीआरएफची आणखी दोन पथके दाखल...

जिल्ह्यामधील लोकप्रतिनिधींच्या निवास्थानापुढे हे आंदोलन केले जाणार आहे. 15 ऑगस्ट रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापुढे शेतकरी आंदोलन करतील. शेतकरी विरोधी धोरणांकडे शासनाचे लक्ष वेधणे व सुधारीत कायद्यांना आक्षेप घेणे, हा उद्देश आंदोलनाचा आहे.

संपादन - स्नेहल कदम 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: farmer will be protest against people leaders home