शेतकऱ्यांची कर्जमुक्ती जोरात...पोस्टरवर झळकले ठाकरे, पवार, थोरात 

प्रमोद बोडके
Saturday, 11 January 2020

महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्तीदुसऱ्या, तिसऱ्या टप्प्यातील योजनेकडे लक्षकर्जमुक्ती योजनेच्या पहिल्या टप्प्यात दोन लाखांपर्यंतच्या थकबाकीदार शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. थकबाकीदार शेतकऱ्यांना सरकारने दिले पण नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना सरकार काय देणार? याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांकडे दोन लाखांपेक्षा अधिक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांसाठी सरकारची काय योजना असणार? याबद्दलही ग्रामीण भागात कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. 

सोलापूर : शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारने महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना हाती घेतली आहे. मंत्रालयापासून ते ग्रामपंचायतीपर्यंतची सर्वच प्रशासकीय यंत्रणा या योजनेच्या कामात जुंपली आहे. या योजनेचे पोस्टर प्रसिद्ध झाले असून या पोस्टरवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात झळकले आहे. शिवसेना-कॉंग्रेस राष्ट्रवादीचे सरकार राज्यात सत्तेवर आल्याने योजनेच्या प्रसिद्धी पत्रकावर तिन्ही पक्षातील प्रमुख नेत्यांचे छायाचित्र झळकले आहेत. 
हेही वाचा - सोलापूर जिल्हा शिवसेना सहसंपर्क प्रमुखाची हकालपट्टी 
शासनाच्या योजनांची प्रसिद्धी करणाऱ्या पत्रकात आतापर्यंत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि संबंधित खात्याचे मंत्री याचे छायाचित्र झळकत होते. राज्यातील सरकार तीन पक्षांचे असल्याने सरकारने केलेल्या कामांचे श्रेय तिन्ही पक्षांना मिळावे यासाठी सत्तेतील तिन्ही पक्षाच्या प्रमुखांचे छायाचित्र झळकविण्यात आले आहे. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने कर्जमाफीच्या योजनेत जिल्हा व तालुकास्तरावरील जबाबदारी सहकार विभागातील अधिकाऱ्यांच्या खांद्यावर दिली होती. त्यामुळे या योजनेत सुसूत्रता आणि समन्वय झाला नव्हता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कर्जमुक्ती योजनेची जबाबदारी जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी व तालुकास्तरावर तहसीलदार यांच्या खांद्यावर दिल्याने जिल्हा व तालुक्‍यातील प्रशासकीय यंत्रणा यांच्यात समन्वय आणि सुसूत्रता दिसत आहे. या योजनेसाठी महसूल, कृषी आणि सहकार विभागाची यंत्रणा अंग झाडून कामाला लागल्याचे दिसत आहे. 
हेही वाचा - पालकमंत्रीपदावरून मंत्री हसन मुश्रीफ यांची गुगली 
पोस्टरवरून सहकारमंत्री गायब 
राज्य सरकार ज्या विभागामार्फत योजना राबविते त्या विभागाच्या मंत्र्याचे छायाचित्र प्रसिद्ध पत्रकात आजपर्यंत प्रसिद्ध होत आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये सहकार खात्याची धुरा साताऱ्याचे बाळासाहेब पाटील सांभाळत आहेत. कर्जमुक्ती योजनेत सहकार विभागाचा वाटा मोठा आहे. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतून सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांचा ना छायाचित्र लावण्यात आले आहे ना नाव टाकण्यात आले आहे. या योजनेच्या प्रसिद्धी पत्रकातून सहकारमंत्री गायब झाल्याचे दिसत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers debt relief is loud ... Thackeray Pawar Thorat highlighted on posters