हत्तरगी नाक्‍यावर क्षणात होणार टोल वसूली; कशी काय ? 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 नोव्हेंबर 2019

नाका ओलांडताना फास्टॅग आपोआप स्कॅन होऊन वाहनमालकाच्या खात्यातून टोलची रक्कमही वसूल केली जाईल. यामुळे टोलनाक्‍यांवरील गर्दीही कमी होणार आहे. कोगनोळी टोलनाक्‍यावरही ही कार्यवाही करण्यात येणार असून त्यादृष्टीने हालचाली सुरू आहेत. 

बेळगाव - कर्नाटकातील सर्व टोलनाक्‍यांवर 1 डिसेंबरपासून शुल्क रोखीने घेतले जाणार नाही. तर फास्टॅगच्या माध्यमातून टोल स्वीकारला जाणार आहे. हत्तरगीसह सर्व टोलनाक्‍यांवर त्याबाबत जागृती केली जात आहे. राष्ट्रीय महामार्गावरुन जाणाऱ्या सर्वच वाहनांवर यापुढे फास्टॅग अत्यावश्‍यक ठरणार आहे. त्यामुळे वाहनमालकांना टोल नाक्‍यावर थांबण्याची गरज भासणार नाही.

नाका ओलांडताना फास्टॅग आपोआप स्कॅन होऊन वाहनमालकाच्या खात्यातून टोलची रक्कमही वसूल केली जाईल. यामुळे टोलनाक्‍यांवरील गर्दीही कमी होणार आहे. कोगनोळी टोलनाक्‍यावरही ही कार्यवाही करण्यात येणार असून त्यादृष्टीने हालचाली सुरू आहेत. 

400 टोलनाक्‍यांवर प्रायोगिक तत्वावर फास्टॅग

टोलनाक्‍यांवरील गर्दी हा वाहनचालकांसाठी कंटाळवाणा प्रकार ठरतो. गेल्या काही वर्षात वाहनांची संख्या वाढल्याने टोल नाक्‍यांवरील गर्दीही वाढत आहे. सलग सुट्ट्या किंवा सणासुदीच्या काळात हा प्रकार सर्वाधिक होतो. त्यावर उपाय म्हणून रस्ते वाहतूक व दळणवळण मंत्रालयाने फास्टॅगचा निर्णय घेतला आहे. त्याबाबत प्रत्येक टोलनाक्‍यावर जागृती केली जात आहे. देशातील 400 टोलनाक्‍यांवर प्रायोगिक तत्वावर फास्टॅगच्या माध्यमातून टोलवसुली केली जात आहे. काही नाक्‍यांवर फास्टॅग लावलेल्या वाहनांसाठी स्वतंत्र मार्गीका तयार केल्या आहेत. पण, 1 डिसेंबरपासून प्रत्येक मार्गीकेतून फास्टॅग लावलेलेच वाहन जाणार आहे. 

कशी आहे फास्टॅगची सुविधा
फास्टॅग हे एक कार्ड असून ते गाडीवर लावले जाईल. नाका ओलांडताना ते कार्ड आपोआप स्कॅन होऊन वाहनमालकाच्या खात्यातून आपोआप टोलची रक्कम कपात होईल. या नव्या प्रयोगामुळे वेळ व इंधनाची मोठी बचत होणार आहे. या फास्टॅगला क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, इंटरनेट वा मोबाईल बॅंकिंगसह रिचार्ज करता येणार आहे. फास्टॅग वापरणाऱ्यांना विविध बॅंकांकडून मनी बॅक व अन्य ऑफर्स दिल्या जात आहेत. 2019-20 या आर्थिक वर्षात फास्टॅगचा वापर करणाऱ्यांना 2.5 टक्के कॅशबॅक देण्यात येत आहे. या फास्टॅगवर एक लाखापर्यंत अपघाती वीमा देण्याची घोषणाही काही बॅंकांनी केली आहे. 

इथे मिळेल फास्टॅग 
नव्याने वाहन खरेदी करणाऱ्यांना वितरकाकडूनच फास्टॅग दिले जाणार आहे. जुन्या वाहनांसाठी राष्ट्रीय महामार्गावरील पॉईंट ऑफ सेलमधून फास्टॅग विकत घेता येईल. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाशी संलग्न असलेल्या खासगी बॅंका तसेच सिंडिकेट, ऍक्‍सिस, आयडीएफसी, एचडीएफसी, आयसीआयसीआय, एसबीआय आदी बॅंकांमध्येही फास्टॅग मिळणार आहे. पेटीएमवरही फास्टॅग उपलब्ध आहे.  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: FasTag Facility On Hattargi Toll Naka From 1 December