कोरोना झाल्याने वडिलांची आत्महत्या, बाधित मुलाचा रुग्णालयात मृत्यू 

अजित झळके
Sunday, 6 September 2020

कुटुंबातील पाच सदस्यांना कोरोनाची बाधा झाल्याने धास्तावलेल्या वडिलांनी गळफास घेऊन आत्महत्या केली तर त्यानंतर काही तासातच मिरज येथे रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलाचाही मृत्यू झाला. 24 तासांच्या आत दुधगाव येथील एक हसतं खेळतं कुटुंब उद्‌ध्वस्त होऊन गेलं. जैन बस्तीत पंडीत असणाऱ्या उपाध्ये कुटुंबावर काळाने घाला घातला. 

सांगली ः कुटुंबातील पाच सदस्यांना कोरोनाची बाधा झाल्याने धास्तावलेल्या वडिलांनी गळफास घेऊन आत्महत्या केली तर त्यानंतर काही तासातच मिरज येथे रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलाचाही मृत्यू झाला. 24 तासांच्या आत दुधगाव येथील एक हसतं खेळतं कुटुंब उद्‌ध्वस्त होऊन गेलं. जैन बस्तीत पंडीत असणाऱ्या उपाध्ये कुटुंबावर काळाने घाला घातला. 

मिरज पश्‍चिम भागातील दुधगावमध्ये उपाध्ये कुटुंब आहे. त्यातील अशोक उपाध्ये आणि त्यांची दोन मुले, पत्नी आणि सुनेला कोरोनाची बाधा झाली. घरातली लहान मुलगी कोरोना बाधित झाली नाही. पाच जण कोरोना बाधित झाल्याने अशोक उपाध्ये खूप घाबरले होते. मुलगा दीपक याला मिरजेतील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्याची प्रकृती अतिशय ढासळली होती. या काळात अशोक उपाध्ये तणावात गेले होते. सारे कुटुंब या संकटाचा सामना कसा करणार, या विचाराने ते अस्वस्थ होते. त्यात आर्थिक भार पेलवणार नाही, ही भिती त्यांना वाटत होती. त्यातून त्यांनी काल राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्या धक्‍क्‍यातून हे कुटुंब अजून सावरायचे होते. तोवर मिरजेतील रुग्णालयातून एक वाईट बातमी आली. तेथे उपचार घेणाऱ्या दीपक उपाध्ये (वय 34) यांचा कोरोनाने मृत्यू झाला. 24 तासाच्या आत घरातील दोन कर्ती माणसे गेली. या कुटुंबावर काळाने घाला घातला.

 
संबंध दुधगाव आणि मिरज पश्‍चिम भागात या घटनेने शोककळा पसरली आहे. कोरोनाची धास्ती सगळीकडे वाढली आहे. या पार्श्‍वभूमीवर माजी खासदार राजू शेट्टी यांनी फेसबुकवर एक पोस्ट करून साऱ्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला आहे. कोरोना झाल्यावर वेळ काढू नका, वेळीच उपचार घ्या, घाबरून जावू नका, असे आवाहन त्यांनी केले आहे. त्यात उपाध्ये कुटुंबाबद्दल हळहळ व्यक्त केली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Father commits suicide due to corona, infected child dies in hospital