अंकलखोप परिसरात चार गवे शिरल्याने भीती

वैभवकुमार यादव 
Tuesday, 26 January 2021

अंकलखोप (ता. पलूस) परिसरातील वैभवनगर व रामराव नगर शेती शिवारात काल (ता. 24) रात्री साडे दहा ते अकराच्या सुमारास चार गव्यांचे दर्शन झाले. रात्री उशिरा शेतीचा वीज पुरवठा सुरू झाल्यानंतर नागरिकांना आपल्या शेताकडे जात असताना त्यांना गवे दिसले. यामुळे शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण पसरले आहे. 

अंकलखोप : अंकलखोप (ता. पलूस) परिसरातील वैभवनगर व रामराव नगर शेती शिवारात काल (ता. 24) रात्री साडे दहा ते अकराच्या सुमारास चार गव्यांचे दर्शन झाले. रात्री उशिरा शेतीचा वीज पुरवठा सुरू झाल्यानंतर नागरिकांना आपल्या शेताकडे जात असताना त्यांना गवे दिसले. यामुळे शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण पसरले आहे. 

हालगी परिसरातील तरुण रात्री वाहनातून घरी निघाले होते. त्यांना सर्वप्रथम गवे दिसले. वाहनाचे दिवे व आवाजामुळे ते उसात शिरले. घरी जाऊन त्यांनी गावात माहिती दिली. दिलीप भाऊसो यादव यांनी सरपंच अनिल विभूते यांना याबाबत माहिती दिली. सरपंचांनी तत्काळ वन विभागाशी संपर्क साधून गवे दिसल्याचे सांगितले. वनपालांनी ग्रामस्थांनी गव्यांच्या मागे लागू नये. जसे आले तसे ते दुसरीकडे निघून जातील. दरम्यान, गवे आल्याची माहिती मिळताच हुतात्मा भगतसिंह हायस्कूल परिसरात काही तरुण मोबाईलवर चित्रीकरण करू लागले. मात्र शिवव्याख्याते अतुल पाटील यांनी त्यांना घरी पाठवले. 

अंकलखोप येथे ऊस पिकांचे मोठे क्षेत्र आहे त्यामुळे त्या लपण्यासाठी खूप जागा आहे. नदीकाठ परिसरात शेतकऱ्यांची घरेही मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांबरोबरच इतर नागरिकांची या रस्त्यावर ये-जा सुरू असते. त्यामुळे या जंगली गव्यांचा बंदोबस्त करावा, अशी शेतकऱ्यांकडून मागणी होत आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी नागठाणे- आष्टा रस्त्यावर गवा आढळलेला होता. 

आज सकाळी गवे दिसलेल्या परिसरात वनपाल ढेरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी पाहणी केली. यावेळी सरपंच श्री. विभूते व वनपाल श्री. ढेरे यांनी ग्रामस्थांना, "गव्यांना नाहक त्रास देऊ नका. ते आले तसे ते निघून जातील. फोटो किंवा व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करू नका' असे आवाहन केले.

 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fear of four cows entering Ankalkhop area