निघोज परिसराची भीतीने गाळण; बिबट्या पुन्हा वाजेवाडीत

सुधीर पठारे
मंगळवार, 5 नोव्हेंबर 2019

वडनेर बुद्रुक व वाजेवाडी शिवारात गेल्या वर्षापासून पाच बिबट्यांचा वावर असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. यापूर्वी त्या भागातील गणपत येवले, रामभाऊ पवार, भिका येवले, रामदास मेचे, अनिल नऱ्हे, नाना ठोंबरे या शेतकऱ्यांची जनावरे बिबट्याच्या हल्ल्यात दगावली.

निघोज (पारनेर) : पारनेर तालुक्‍यातील म्हस्केवाडी, दरोडी, निघोज, अळकुटी परिसरानंतर बिबट्याने सोमवारी (ता. पाच) रात्री वडनेर बुद्रुक येथील वाजेवाडीकडे मोर्चा वळविला आहे. या परिसरात बिबट्या दिसल्याने ग्रामस्थांची झोप उडाली आहे. नागरी वस्तीत बिबट्या घुसल्याने दहशतीचे वातावरण आहे. वन विभागाने बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

वडनेर बुद्रुक, वाजेवाडी परिसरात मंगळवारी पहाटेच्या सुमारास बिबट्या सुभाष वाजे, चंद्रशेखर शेटे, संजय वाजे, गणेश शेटे, रमेश वाजे या शेतकऱ्यांच्या दृष्टीस पडला. शिरापूर येथे बिबट्याच्या हल्ल्यात दिग्विजय उचाळे हा शालेय विद्यार्थी गंभीररीत्या जखमी झाला होता, तर वडनेर बुद्रुक येथील वाजेवाडी परिसरात राधाबाई कारभारी वाजे (वय 69) यांचा मृत्यू झाला होता. शिरापूर येथेही मेंढपाळाची मुलगी सानिका बरकडे हिला जीव गमवावा लागला.

वडनेर बुद्रुक व वाजेवाडी शिवारात गेल्या वर्षापासून पाच बिबट्यांचा वावर असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. यापूर्वी त्या भागातील गणपत येवले, रामभाऊ पवार, भिका येवले, रामदास मेचे, अनिल नऱ्हे, नाना ठोंबरे या शेतकऱ्यांची जनावरे बिबट्याच्या हल्ल्यात दगावली. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

ग्रामस्थांच्या मागणीवरून या भागात दोन ठिकाणी पिंजरे लावले आहेत. मात्र, बिबटे पकडण्यासाठी वन विभागाने विशेष प्रयत्न केले नसल्याचा ग्रामस्थांचा दावा आहे. "सकाळ'ने याबाबत वेळोवेळी पाठपुरावा करूनही वन विभागाने दखल घेतली नसल्याची बाब समोर आली होती. म्हस्केवाडी, दरोडी या भागातील अनेक जनावरेही बिबट्याने फस्त केल्याचे प्रकरण ताजे असतानाच, वाजेवाडी परिसरात बिबट्या दिसल्याने घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.

येथील ग्रामस्थ जीव मुठीत धरून शेतीची कामे करीत आहेत. निघोज, वडनेर बुद्रुक, वाजेवाडी, शिरापूर हा कुकडी नदीकाठचा परिसर असल्यामुळे उसाचे व इतर पिकांचे क्षेत्र जास्त असल्यामुळे बिबट्यांचा मुक्काम दिवसेंदिवस वाढतच चालल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे. बिबट्यांचा वावर वाढल्याने येथील लोकांच्या मनातील भय संपता संपेना, अशी अवस्था झाली आहे. घटनास्थळी येत पारनेरच्या वनाधिकारी अश्विनी दिघे यांनी बिबटे पकडण्यासाठी खास मोहीम हाती घेण्याचे आश्वासन वडनेर व परिसरातील ग्रामस्थांना दिले होते. मात्र, वन विभागाने ते फारसे गांभीर्याने घेतलेले नाही.

या परिसरातील शेतीपंपांना दिवसा वीज द्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा वडनेर बुद्रुक व वाजेवाडी ग्रामस्थांनी महावितरणला दिला होता. संबंधित मागणीचे निवेदन विधानसभेचे मावळते उपाध्यक्ष विजय औटी व पारनेर महावितरणचे कनिष्ठ अभियंता गौरव चरडे यांना देण्यात आले. मात्र, वीजपुरवठ्यात बदल झाला नसल्याचा आरोप येथील ग्रामस्थांनी केला आहे.

आरडाओरडा केल्याने बचावले..!
मंगळवारी पहाटेच्या सुमारास बिबट्याला पाहिल्यानंतर शेतकऱ्यांनी आरडाओरडा केल्याने ते बचावले. गावाजवळ बिबट्याचा वावर वाढल्याने ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fear of leopards in Nighoj area