भाजपमध्ये स्थायी सभापतीपदासाठी नेत्यांसह सदस्यांकडेही फिल्डींग

बलराज पवार 
Tuesday, 22 September 2020

सत्ताधारी भाजपमध्ये स्थायी समिती सभापतीपदासाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. इच्छूक सदस्यांनी नेत्यांसह सदस्यांकडेही फिल्डींग लावण्यास सुरुवात केली आहे.

सांगली : सत्ताधारी भाजपमध्ये स्थायी समिती सभापतीपदासाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. इच्छूक सदस्यांनी नेत्यांसह सदस्यांकडेही फिल्डींग लावण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे तीन शहरापैकी कुणाच्या गळ्यात ही माळ पडणार याकडे लक्ष लागले आहे. 

कुपवाडचे गजानन मगदूम, सांगलीच्या सविता मदने आणि मिरजेचे पांडुरंग कोरे यांची नावे चर्चेत आहेत. त्यांनी आपल्याला पद मिळावे यासाठी प्रयत्न चालवले आहेत. फेब्रुवारीतील महापौर पदाची निवडणूक समोर ठेवून भाजपचे नेते कुणालाही नाराज न करता सभापती निवडण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यामुळे कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भाजपच्या हालचालींवर लक्ष ठेवत वेट अँड वॉचची भूमिका ठेवली आहे. 

पहिल्या दोन वर्षात सांगली आणि मिरजेवरच पदांची मेहेरबानी झाल्याने कुपवाडचे गजानन मगदूम यांनी जोर लावला आहे. कुपवाडमधून भाजपला मोठे सहकार्य मिळाल्याने आता कुपवाडला संधी मिळावी यासाठी मगदूम प्रयत्न करत आहेत. 

भविष्यातील राजकीय घडामोडी लक्षात घेऊन काही सदस्यांची त्यांना पसंती आहे. तर महापौर पदासाठी शेवटपर्यंत स्पर्धेत राहूनही ऐनवेळी डावलले गेलेल्या सविता मदने यांना संधी देण्यासाठी एक गट धडपडत आहे. मिरजेचे निष्ठावंत भाजप कार्यकर्ते म्हणून ओळख असलेल्या पांडुरंग कोरे यांच्या गळ्यात सभापतीपदाची माळ घातल्यास पुढचे राजकारण सोयीचे होईल यादृष्टीने काही नेते प्रयत्न करत आहेत. एकूणच फेब्रुवारीतील महापौरपदाच्या शह-काटशहाचेही राजकारण रंगणार आहे. एकूणच याचा विचार करून दगा फटका होऊ नये याची नेते खबरदारी घेत आहेत. 

दुसरीकडे भाजपचे नऊ, आघाडीचे सात असे काठावरचे संख्याबळ आहे. त्यामुळे यातून सत्ताधारी भाजपमधील कोणी नाराज गळाला लागतो का, यावरही आघाडीतील सदस्य आणि नेत्यांचे लक्ष आहे. त्यातून जमल्यास त्याला पाठबळ किंवा त्यांच्या पाठबळावर आघाडीचा सभापती बनविण्याचे मनसुबे आहेत. प्रशासनाकडून सभापती निवडीसाठी मंगळवारी विभागीय आयुक्तांकडे प्रस्ताव जाणार आहे. त्यानुसार निवडीची वेळ ठरणार आहे. 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fielding for permanent chairmanship in BJP