पन्नास हजार पालकांचे ऑनलाईन संमतिपत्र : सुधाकर तेलंग

बलराज पवार
Sunday, 22 November 2020

दीड लाख विद्यार्थ्यांपैकी 50 हजार 329 विद्यार्थ्यांच्या पालकांनी शिक्षण विभागाला ऑनलाईन संमतिपत्र दिल्याची माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी सुधाकर तेलंग यांनी दिली.

सांगली : राज्य शासनाने दिलेल्या सूचनेनुसार जिल्ह्यातील 9 ते 12 वीचे वर्ग असणाऱ्या शाळा उद्या (ता. 23) सुरू होत आहे. त्यासाठी दीड लाख विद्यार्थ्यांपैकी 50 हजार 329 विद्यार्थ्यांच्या पालकांनी शिक्षण विभागाला ऑनलाईन संमतिपत्र दिल्याची माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी सुधाकर तेलंग यांनी दिली. 

कोविड 19च्या साथीमुळे मार्चनंतर शाळा पूर्ण बंद आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने राज्य शासनाने नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यास काही अटी, शर्तींवर परवानगी दिली आहे. त्यानुसार सोमवारपासून (ता. 23) नववी ते बारावीचे वर्ग असलेल्या शाळा सुरू होत आहेत.

विद्यार्थ्यांनी शाळेत येताना पालकांचे संमतिपत्र आणणे बंधनकारक आहे. दरम्यान, जिल्ह्यात नववी ते बारावीचे एक लाख 47 हजार 486 विद्यार्थी असून त्यापैकी 50 हजार 329 विद्यार्थ्यांच्या पालकांचे ऑनलाईन संमतिपत्र शिक्षण विभागाला प्राप्त झाले आहे. उर्वरित विद्यार्थी उपस्थित राहताना संमतिपत्र घेऊन येतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. 

या शाळांमध्ये सुमारे साडेआठ हजार शिक्षक माध्यमिक शाळेशी निगडित आहेत. त्यांची कोरोना चाचणी घेण्यात येत आहे. सुमारे पाच हजार शिक्षकांची चाचणी घेण्यात आली आहे. कोरोनाची लक्षणे असलेल्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची आरटीपीसीआर तपासणी करण्यात येणार आहे. लक्षणे नसलेल्या शिक्षकांना रॅपिड ऍन्टीजेन चाचणी करावी लागेल. दोन्ही चाचण्या प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामीण रुग्णालयात मोफत केल्या जात आहेत.

प्रत्यक्ष वर्गांचा कालावधी तीन ते चार तासांपेक्षा अधिक असू नये. त्यामुळे जेवणाची सुटी ठेवलेली नाही. विद्यार्थ्यांना एकदिवस आड शाळेत बोलवावे. गणित, विज्ञान व इंग्रजी हे विषय शाळेत शिकवावेत. उर्वरित विषय ऑनलाईन पद्धतीने शिकविले जातील. सोय असेल तर प्रत्यक्ष वर्गात सर्व विषय शिकविण्यास हरकत नाही, अशा सूचना शिक्षणाधिकारी तेलंग यांनी संबंधित सर्व मुख्याध्यापकांना दिल्या आहेत. 

संपादन : युवराज यादव 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fifty thousand parents' online consent: Sudhakar Telang