अखेर विश्रामबागच्या पिंपळाला जीवदान मिळाले; सुमारे चार तासाच्या प्रयत्नांनंतर यशस्वी पुनर्रोपन 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 21 July 2020

नेचर कॉन्झर्व्हेशन सोसायटीच्या कार्यकर्त्यांनी आग्रहापुढे नमते घेत महापालिकेने हे चांगले काम आज पार पाडले.

सांगली ः विश्रामबाग येथील एमएससीबी कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या रुंदीकरणात अडथळा ठरणाऱ्या पिंपळ वृक्षाचे आज पुर्नरोपन करण्यात आले. नेचर कॉन्झर्व्हेशन सोसायटीच्या कार्यकर्त्यांनी आग्रहापुढे नमते घेत महापालिकेने हे चांगले काम आज पार पाडले. विश्रामबागमधील खरे मंगल कार्यालयाजवळील महापालिकेच्या खुले नाट्यगृहाच्या आवारात ते लावण्यात आले. 

वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाने या रुंदीकरणासाठी जागा दिल्यानंतरही गेल्या अनेक दिवसांपासून रस्त्याचे काम रेंगाळले होते. या कामात हे पिंपळाचे झाड मध्येच येत होते. सुमारे पंच्चावन फुट उंचीचे आणि एक मीटर घेराचा बुंधा असलेले हे झाड साधारण चाळीस वर्षापुर्वीचे असावे. पिंपळाचे वयोमान नऊशे वर्षापर्यंतचे असते त्यामुळे हे झाड तसे बालवयातलेच. त्यामुळे हे झाड जगावे असा कार्यकर्त्यांचा आग्रह होता. एमएससीबी आणि बांधकाम विभागाने हे झाड हटवलेच पाहिजे असा आग्रह धरला. शेवटी आमदार सुधीर गाडगीळ यांनी मध्यस्थी केली.

त्यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना पृनर्रोपणासाठी आवश्‍यक तो खर्च द्यावा असे आदेश दिले. गेले महिनाभर प्रशासकीय प्रक्रिया झाल्यानंतर आज सर्व कार्यकर्ते आणि महापालिका कर्मचाऱ्यांनी क्रेन्सच्या सहाय्याने झाड सुमारे एक मीटर खोलवर खुदाई करून झाड काही मुळांसह बाहेर काढले. आधीच खुले नाट्यगृह परिसरात खड्डा खोदला होता. त्यामध्ये खते, पोषक द्रव्ये टाकून त्याचे पुर्नरोपन झाले. सध्याच्या पावसाळी हवेत हे झाड नक्की जगेल अशी खात्री सोसायटीचे डॉ.हर्षद दिवेकर यांनी व्यक्त केली.

नगरसेविका सविता मदने, राजा देसाई, महापालिकेचे कर्मचारी अनिल पांढरे, अवधुत पांढरे, संतोष गर, बाळाप्पा लवटे, रमेश चव्हाण, अमित प्रसाद, लवकुमार पाटील, नेचर कॉन्झर्व्हेशन सोसायटीचे डॉ हर्षद दिवेकर, तबरेजखान, अरविंद सोमण, पुष्कर कागलकर, विशाल कुलकर्णी, अमोल तडकर, राहुल पवार, अमोल जाधव, स्वरुप वाटवे, समीर नालबंद, केतन कशाळीकर, अक्षय चिंचणीकर, प्रसाद वैद्य यांनी या कामी पुढाकार घेत हे सत्कार्य पार पाडले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Finally, Pimpala of Vishrambag was saved; Successful transplantation after about four hours of effort