इस्लामपुरात ४० पैकी फक्त पाच रुग्णालयांचे फायर ऑडिट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इस्लामपुरात ४० पैकी फक्त पाच रुग्णालयांचे फायर ऑडिट

इस्लामपुरात ४० पैकी फक्त पाच रुग्णालयांचे फायर ऑडिट

इस्लामपूर : नगरपालिका क्षेत्रातील ४० पैकी फक्त पाच रुग्णालयाचा फायर ऑडिट अहवाल नगरपालिकेच्या अग्निशामक दलाला सादर केला आहे. राज्यात विविध ठिकाणी हॉस्पिटल मध्ये आगीच्या दुर्घटना होऊनही तितके गांभीर्य अनेक हॉस्पिटलमध्ये दिसून येत नाही. फायर ऑडिट करून घेण्याचा मुख्याधिकारी यांचा आदेश असतानाही त्याकडे दुर्लक्ष होत असेल तर ही बाब गंभीर आहे.

वर्षभरात काही महिन्यांच्या अंतराने राज्यात अनेक हॉस्पिटलमध्ये आगीच्या दुर्घटनेत कित्तेक रुग्णांचा बळी गेला आहे. अहमदनगर येथील सिव्हिल रुग्णालयात आगीच्या दुर्घटनेत ११ रुग्णांचा मृत्यू झाला. भंडारा जिल्ह्यात जानेवारी २१ मध्ये रुग्णालयात आगीची दुर्घटना झाली होती. एप्रिल मध्ये विरार येथील कोरोना रुग्णालयात आगीच्या दुर्घटनेत १३ रुग्णांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, ठाणे येथील रुग्णालयात आगीच्या दुर्घटनेत ४ रुग्ण दगावले होते. याचा बोध घेणे आवश्यक आहे पण तितके गांभीर्य अनेक हॉस्पिटलमध्ये दिसून येत नाही.

हेही वाचा: द्राक्षबागांवर डाऊनी मिलेड्युचा प्रादुर्भाव

नगरपालिकेने १५ वर्षापासून शासनाच्या आदेशाप्रमाणे हॉस्पिटलना फायर ऑडिट अहवालबाबत सूचना, नोटिसा देऊनसुद्धा आजपर्यंत त्याची काही हॉस्पिटलनी अजून दखलसुद्धा घेतलेली नाही.

महाराष्ट्र फायर सर्व्हिसने खासगी फायर एजन्सी निश्चित केलेल्या आहेत. त्यांच्याकडून फायर ऑडिट करून घ्यावयाचे आहे. या फायरऑडिटसाठी रुग्णालयाच्या आकारानुसार ४० हजारांपासून १ लाखापर्यंत शुल्क भरावे लागते. नगरपालिकेच्या अग्निशमक विभागाकडून दरवर्षी अग्निशमक यंत्रणेची तपासणी करून त्याचे नूतनीकरण केले जाते.

प्रशिक्षण आवश्यक

बॉम्बे नर्सिंग होम ॲक्ट अंतर्गत रुग्णालय उभारणी करताना अनेक परवाने, ना हरकत दाखल्यांची आवश्यकता आहे. त्यामध्ये ‘अग्निशमन’ दाखल्याचाही समावेश आहे. त्याच्यासाठी रुग्णालयात अग्निसुरक्षा यंत्रणा उभारली जाते. आगीची दुर्घटना घडल्यास ही यंत्रणा हाताळायची कशी याचे प्रशिक्षण त्याठिकाणच्या कर्मचाऱ्यांनी घेणे तितकेच महत्त्‍वाचे आहे.

" शासनाच्या आदेशाप्रमाणे हास्पिटलना इमारतीचे फायर ऑडिट करून अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ही अत्यावश्यक बाब आहे. काही हॉस्पिटल याची पूर्तता प्रत्येक वर्षी करीत आहे. परंतु बहुतांशी हॉस्पिटल याकडे कानाडोळा करीत आहेत. याचा फटका रुग्णांना बसू शकतो."

- दिलीप कुंभार, अग्निशामक विभाग,नगरपालिका इस्लामपूर, (ता. वाळवा, जि. सांगली)

loading image
go to top