सांगलीतील आटपाडीच्या बाजारात आला तब्बल दीड कोटींचा मोदी बकरा!

नागेश गायकवाड
Monday, 30 November 2020

कार्तिक यात्रा रद्द करून त्याऐवजी भरलेल्या शेळ्या-मेंढ्यांच्या बाजारात सांगोल्याचे शेतकरी बाबुराव मिटकरी यांच्या मोदी बकऱ्याला 70 लाखांची मागणी झाली.

आटपाडी (जि. सांगली ) : कार्तिक यात्रा रद्द करून त्याऐवजी भरलेल्या शेळ्या-मेंढ्यांच्या बाजारात सांगोल्याचे शेतकरी बाबुराव मिटकरी यांच्या मोदी बकऱ्याला 70 लाखांची मागणी झाली. त्यांनी या बकऱ्याची दीड कोटी किंमत सांगितली आहे. याशिवाय जातिवंत बकरी आणि मेंढ्यांची लाखो रुपयांत खरेदी-विक्री झाली. 

आटपाडीचे ग्रामदैवत उत्तरेश्वर देवस्थानची यात्रा दरवर्षी कार्तिक महिन्यात पौर्णिमेला भरते. यावर्षी कोरोनामुळे यात्रा रद्द केली आहे. मात्र शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी प्रशासनासोबत बैठक घेऊन शेळ्या-मेंढ्यांचा बाजार दोन दिवस भरवण्याचा निर्णय घेतला होता. यात रविवारी (ता. 29) पहिल्या दिवशी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात भरगच्च शेळ्या-मेंढ्यांचा बाजार भरला. यामध्ये सांगली, सातारा, कोल्हापूर, विजापूर या भागातील मेंढपाळ जातिवंत बकरे आणि मेंढ्या विक्रीसाठी घेऊन आले होते. त्याच्या खरेदीसाठी हौशी मेंढपाळही मोठ्या संख्येने दाखल झाले होते. 

या बाजारामध्ये सांगोला तालुक्‍यातील चांडोलवाडी येथील बाबुराव मेटकरी यांनी आणलेला मोदी बकरा सर्वाधिक आकर्षक ठरला. त्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी उसळली होती. या बकऱ्याला सुरवातीला 70 लाखांची मागणी नोंदवली आहे; मात्र मिटकरी यांनी याची किंमत दीड कोटी सांगितली आहे. या बकऱ्याच्या मागणीचा किमतीत वाढ होत चालली आहे. याशिवाय या "मोदी'चे लहान पिल्लू असलेल्या या सोमनाथ जाधव यांच्या दोन महिन्यांच्या मेंढीला 14 लाखांची मागणी केली आहे. बाजारामध्ये एक लाखापासून दोन, चार, सहा, दहा-बारा लाखांपर्यंत बकऱ्यांना मागणी होत होती. बाजारात शेळ्या-मेंढ्यांच्या खरेदीसाठी पुणे, गोवा, कोल्हापूर, सांगली येथून मोठ्या संख्येने व्यापारी आले होते. 

यावेळी जातिवंत बकऱ्याची हलगीच्या साथीने बाजार आवारातून मिरवणूक काढली जात होती. शेतकऱ्यांनी मेंढ्या आणि बकरे सजवून विक्रीसाठी आणले होते. बाजाराला माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब गायकवाड, संचालक विष्णू अर्जुन, सरपंच वृषाली पाटील आदींनी भेट दिली. 

म्हणून दिले मोदींचे नाव... 
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चांगले काम करून जगभर नाव मिळवले आहे. ते आमचे आदर्श आहेत, त्यामुळे त्यांचे नाव या बकऱ्याला दिले आहे. आमच्या या जातिवंत बकऱ्याचाही मोठा नावलौकिक झाला आहे. तो आमचा जीव की प्राण आहे. जतच्या व्यापाऱ्याने 70 लाखापर्यंत मागणी केली आहे. मात्र आम्ही दीड कोटी रुपये किंमत सांगितली आहे. अनेकजण सांगतात, भरपूर किंमत झाली, विकून टाका; पण आम्ही विकणार नाही कारण याच्यापासून होणाऱ्या पिल्ल्यांची दहा ते पंधरा लाखापर्यंत विक्री होते आणि केली आहे, असे बाबुराव मेटकरी यांनी सांगितले. असे जातिवंत बकरे कापण्यासाठी नाही, तर प्रजोत्पदानासाठी आणि नव्या संकरित जाती विकसीत करण्यासाठी उपयोगात आणले जातात, असे जाणकारांनी सांगितले. 

संपादन : युवराज यादव 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: first bid of Rs 70 lakh for a goat at atpadi goat market