दुष्काळातल्या या गावात आता होते मासेमारी...

नागेश गायकवाड
बुधवार, 18 मार्च 2020

जिथे पिण्याच्या पाण्यासाठी पिढ्यान्‌पिढ्या वणवण करावी लागत होती त्या दुष्काळी आटपाडी तालुक्‍यातील जांभुळणी गावात खुद्द ग्रामपंचायतीनेच पुढाकार घेत चक्क मासे पाळण्याचा उद्योग सुरू केला आहे.

आटपाडी ः जिथे पिण्याच्या पाण्यासाठी पिढ्यान्‌पिढ्या वणवण करावी लागत होती त्या दुष्काळी आटपाडी तालुक्‍यातील जांभुळणी गावात खुद्द ग्रामपंचायतीनेच पुढाकार घेत चक्क मासे पाळण्याचा उद्योग सुरू केला आहे. गावातीलच बेरोजगार तरुणांना गावातील ओढ्यावरील सहा बंधाऱ्यांमधील पाणी साठे मासेमारीसाठी भाड्याने दिले असून त्यातून ग्रामपंचायतीच्या उत्पन्नात मोठी भर पडेल अशी आशा आहे. टेंभू योजनेच्या पाण्याने गावे बदलत आहेत त्याचा हा एक नमुना आहे.

गाव ओढ्यावर एकूण बारा बंधारे आहेत. त्यापैकी पाच बंधारे आणि एक कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यावरा भाडेतत्त्वावर हा प्रकल्प सुरू आहे. मुंबईत हमाली करणाऱ्या तरुणांना महिन्याला हजार आणि केटीवेअरसाठी मासिक दोन हजार रुपये प्रमाणे बारा महिन्यांसाठी हे तलाव भाडेतत्त्वावर दिले आहेत. त्याआधी ग्रामपंचायतीने या तरुणांना तज्ज्ञांकरवी गावातच मत्स्यपालनाचे प्रशिक्षणही दिले. 

त्यानंतर अडीच महिन्यांपूर्वी पश्‍चिम बंगालमधून आणलेली एक लाख मत्स्यबीजे प्रत्येक बंधाऱ्यात सोडली आहेत. सध्या या माशांसाठी खाद्यही सोडले जाते. सर्व बंधारे पाण्याने भरले आहेत. तसेच टेंभूच्या मुख्य कालव्यातून थेट बंधाऱ्यात पाणी येऊ शकते. त्यामुळे भविष्यातही पाण्याची फारशी अडचण जाणवणार नाही असा ग्रामपंचायतीचा दावा आहे. वाहत्या पाण्याच्या काळात मासे उलट्या प्रवाहाने वर जातात म्हणून अत्यंत मजबूत आणि लहान लोखंडी जाळ्या प्रत्येक बंधाऱ्यावर आणि खाली लावल्या आहेत. त्यामुळे मासे बाहेर जाऊ शकत नाहीत. सध्या ग्रामपंचायतीच्या या उद्योगाची तालुकाभर चर्चा असून उत्पन्नाचा स्रोत म्हणून अनेक ग्रामपंचायतीचे प्रतिनिधीही सध्या गावात भेटी देत आहेत. 

गणित असे 
प्रत्येक बंधाऱ्यात एक लाख बीज सोडले आहे. यातील 25 टक्के मासे तयार होतील. साधारण तीन महिन्यांत प्रत्येक माशाचे सध्याचे वजन 250 ग्रॅम आहे. साधारण सात महिन्यात त्याचे प्रत्येकी 500 ते 700 किलोग्रॅम वजन होईल. सरासरी अर्धा किलो वजनाचा मासा धरल्यास प्रत्येक बंधाऱ्यातून 12 ते 13 टन उत्पादन अपेक्षित आहे. 80 रुपये प्रती किलो दर गृहीत धरला तरी दहा लाख मिळतील. खर्च वजा जाता सात लाख रुपये एका बंधाऱ्यातून उत्पन्न मिळेल. 

हा उद्योग आणखी कसा विस्तारू शकतो यावर विचार

सामाजिक कार्यकर्ते संपतराव पवार यांच्या कल्पनेतून आणि ग्रामस्थांच्या सहकार्यातून आम्ही बंधारे भाडेतत्त्वावर देऊन त्यामध्ये मत्स्यपालन व्यवसाय उभारला आहे. याचे यश पाहून आम्ही हा उद्योग आणखी कसा विस्तारू शकतो यावर विचार करू.
- सौ. संगीता मासाळ, सरपंच 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: fishing is going on now In drought pron village