सांगलीतील आदीसागर कोविड सेंटरमधून पाचशेवर रुग्णांनी केली कोरोनावर मात 

बलराज पवार
Tuesday, 29 September 2020

सांगली महापालिकेने सुरू केलेल्या आदीसागर कोविड सेंटरमधून आजवर पाचशेहून अधिक रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिली.

सांगली : महापालिकेने सुरू केलेल्या आदीसागर कोविड सेंटरमधून आजवर पाचशेहून अधिक रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिली. महापालिका क्षेत्रात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही 80 टक्के इतके मोठे आहे, असे ते म्हणाले. 

आयुक्त कापडणीस म्हणाले, ""महापालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन आणि रुग्णांसाठी बेडची कमतरता पाहून महापालिकेने कोल्हापूर रोडवरील आदीसागर सांस्कृतिक भवनमध्ये कोविड सेंटर सुरू केले. महापौर, उपमहापौर तसेच सर्व पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने अवघ्या सातच दिवसांत उभारलेल्या या कोविड सेंटरमध्ये मोफत सर्व सुविधा दिल्या आहेत.

आजवर पाचशेहून अधिक रुग्ण या सेंटरमधून उपचार घेऊन कोरोनामुक्त होऊन बाहेर पडले आहेत. सध्या येथे 49 रुग्ण उपचार घेत आहेत. आदीसागरमधील व्यवस्था, जेवण आणि मानसोपचार तज्ज्ञांकडून केले जाणारे समुपदेशन, यामुळे रुग्ण बरे होण्यास मोठी मदत झाली आहे. डॉ. रवींद्र ताटे, डॉ. सुनील आंबोळे सर्व वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी तसेच अन्य स्टाफ यांची मोठी मदत झाली आहे.'' 

85 वर्षीय आजींनी कोरोनाला हरवले 
आदीसागरमध्ये उपचारासाठी दाखल केलेल्या 85 वर्षीय आजींनी कोरोनाला हरवले. आदीसागरच्या स्टाफने टाळ्यांच्या गजरात त्यांना घरी सोडण्यात आले. या आजी 19 सप्टेंबर रोजी आदीसागर कोविड सेंटरमध्ये दाखल झाल्या होत्या. त्यांची ऑक्‍सिजन लेवल कमी झाली होती. आठ दिवस उपचार केल्यानंतर या आजी ठणठणीत बऱ्या झाल्या. समन्वयक इरफान चौगुले यांनी त्यांना कोरोनामुक्त झाल्याचे पत्रही देत त्यांचे अभिनंदन केले.

संपादन : युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Five hundred patients from Adisagar Kovid Center in Sangli overcame the corona