कर्जमाफीत येणे बाकीचा समावेश केल्यास 'यांना' होईल लाभ

Five Lakh Loan Wavier Will Get Benefit Kolhapur Marathi News
Five Lakh Loan Wavier Will Get Benefit Kolhapur Marathi News

कोल्हापूर - शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या निकषामुळे जिल्ह्यातील तब्बल पाच ते साडेपाच लाख शेतकरी वंचित राहत आहेत. १ एप्रिल २००५ ते ३० सप्टेंबर २०२० पर्यंत थकीत कर्जाऐवजी जून २०२० पर्यंत थकीतसह येणे बाकी असणारे कर्जमाफीस पात्र धरल्यास जिल्ह्यासह राज्यातील बहुसंख्य अल्पभूधारक शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे.  

शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस मित्रपक्षांच्या महाविकास आघाडीने राज्यातील शेतकऱ्यांना दोन लाखांपर्यंतचे कर्ज माफ केले आहे. कोणतेही कागदपत्र नाही, कोणाची सही व अंगठा नाही. ज्या त्या खातेदार शेतकऱ्यांच्या खात्यावरच कर्जाची रक्कम जमा केली जाणार आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा होती. शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीचा काही शेतकऱ्यांना निश्‍चितपणे लाभ होईल; पण बहुसंख्य शेतकरी या कर्जमाफीपासून वंचित राहत आहेत. ज्यांनी आतापर्यंत घेतलेल्या कर्जाची प्रामाणिकपणे परतफेड केली आहे, असे शेतकरी या कर्जमाफीस पात्र ठरणार नाहीत.

कर्ज माफ झाल्यास मोठा दिलासा

महाविकास आघाडीला शेतकऱ्यांचा कळवळा आहे. पाऊस, पूर आणि अतिवृष्टीमुळे पिकांची दैना झाली आहे, हे जाहीर आहे. दरम्यान, याचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व महाविकास आघाडीतील नेत्यांनी विचार करून यावर्षीच्या गळीत हंगामानंतर ज्यांचे कर्ज परतफेड केले जाणार आहे त्यांचेही कर्ज माफ झाल्यास मोठा दिलासा मिळणार आहे. 
- सीताराम कदम, शेतकरी

प्रामाणिक शेतकऱ्यांनाही मिळावा लाभ

आतापर्यंत ज्या ज्यावेळी कर्जमाफी जाहीर झाली त्या त्यावेळी जो शेतकरी प्रामाणिकपणे आपल्या कर्जाची परतफेड करतो, त्याला कर्जमाफीपासून वंचित राहावे लागले आहे. आताही तोच कित्ता गिरवला गेला आहे. त्यामुळे राज्यातील अशा अल्पभूधारक शेतकऱ्यांमध्ये निराशा दिसून येत आहे. शासनाने सरसकट कर्जमाफी नाही केली तरी चालेल; पण दोन लाखांपर्यंतच्या कर्जमाफीत प्रामाणिक शेतकऱ्यांनाही लाभ मिळावा, असे मत व्यक्त केले जात आहे. 

केवळ ४०० कोटींची माफी 

कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे साडेपाच लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी २२५० कोटींचे पीक कर्ज घेतले आहे. जिल्हा बॅंकेच्या माध्यमातून १ हजार ५० कोटी, तर राष्ट्रीयीकृत बॅंकांच्या माध्यमातून ८०० कोटी रुपयांचे वाटप झाले आहे. राज्य शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीमध्ये केवळ ७५ हजार ते ८० हजार शेतकऱ्यांना ३५० ते ४०० कोटी रुपयांचा लाभ होणार आहे. यामध्ये उर्वरित शेतकरी कर्जमाफीस अपात्र ठरणार आहेत. जिल्हा बॅंकेच्या ६४ हजार ७८७ शेतकऱ्यांना ३२० कोटींहून अधिक रकमेचा लाभ होणार आहे; पण जे शेतकरी प्रामाणिकपणे कर्ज परतफेड करतात, त्यांना मात्र काडीचाही फायदा होणार नसल्याचे स्पष्ट आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com