साहेब, तुमच्या रुपात मला साक्षात शिवराय दिसले!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 ऑगस्ट 2019

अभिनेते आणि राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आज (शनिवार) इस्लामपूर येथील पूरग्रस्तांची भेट घेतली. तेव्हा तेथील प्रत्येक पूरग्रस्ताच्या तोंडून हेच वाक्य ऐकू येत होते. 

इस्लामपूर : ''खरंच राजं आहात तुम्ही साहेब! आजवर तुम्हाला फक्त टीव्हीवर शिवाजी, संभाजी महाराजांची भूमिका करताना पाहिलं होतं, पण आज तुम्ही आमच्यासाठी इथं आला, तुमच्या रुपात आम्हाला साक्षात शिवरायांचं दर्शन झालं,'' हे शब्द आहेत गेल्या काही दिवसांपासून पूराच्या पाण्यात अडकलेल्या इस्लामपूरच्या रयतेचे.

अभिनेते आणि राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आज (शनिवार) इस्लामपूर येथील पूरग्रस्तांची भेट घेतली. तेव्हा तेथील प्रत्येक पूरग्रस्ताच्या तोंडून हेच वाक्य ऐकू येत होते. 

शिरुर लोकसभा मतदारसंघातील जनतेने देऊ केलेली मदत घेऊन खासदार डॉ. कोल्हे इस्लामपूर येथे दाखल झाले. त्यावेळी 'फूल ना फुलाची पाकळी' म्हणून सोबत आणलेले खाद्यपदार्थ आणि जीवनावश्यक वस्तू त्यांनी पूरग्रस्तांना दिल्या. गेल्या काही दिवसांपासून सांगली जिल्ह्यात पूर आल्याने तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे परिसरातील वातावरणदेखील खराब झाले आहे. मात्र, परिसरात दुर्गंधी पसरली असतानादेखील डॉ. कोल्हे तेथील जनतेला धीर देण्याचे काम करत होते. त्यामुळे तुम्हाला वाळवा तालुका कधीच विसरणार नाही. तुम्ही शिवजन्मभूमीचे खरे शिलेदार शोभता, अशी भावना तेथील नागरिकांनी यावेळी व्यक्त केली.  

सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासनही डॉ. कोल्हे यांनी यावेळी दिले. त्यानंतर जयंत पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांसोबत वाळवा, शिरोळ, कोल्हापूर याठिकाणच्या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ते रवाना झाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Flood affected says that Sir I see Shivaji Maharaj in your form