महापूर सोसला; आता नुकसानीच्या कळा!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 ऑगस्ट 2019

सांगलीत...
३६ हजार ग्रामीण भागातील कुटुंबांचे पंचनामे
४३ हजार शहरातील कुटुंबांचे पंचनामे 
५ हजार रुपये प्रत्येकी रोख मदतीचे वाटप सुरू 
१८५ कार्यरत पथके

सांगली-कोल्हापूरसह बहुतांश रस्ते खुले.
जिल्ह्यात अद्याप १२ गावे पुराने वेढलेली.
एसटीची वाहतूक दोन दिवसांत पूर्ववत.

सांगली - महापूर ओसरू लागल्यानंतर कृष्णाकाठी पूरग्रस्तांच्या नुकसानीच्या कळांनी पुन्हा एकदा धाकधूक सुरू झाली आहे. पूर सोसला, आता नुकसानीच्या धक्‍क्‍यातून सावरण्यासाठीची मानसिकता पूरग्रस्त करीत आहेत. सांगलीसह जिल्हाभरात शासकीय मदतीचे वाटप सुरू झालेले आहे.

येथील आयर्विन पुलापाशी आज पाणीपातळी ४४ फुटांवर म्हणजे धोक्‍याच्या पातळीखाली आहे. शहरातील पूर्ण पाणी नदीपात्रात जाण्यासाठी आणखी एखादा दिवस जाणार आहे. दरम्यान, वीजपुरवठा सुरू करताना दूधगाव (ता. मिरज) येथील एक वायरमनचा विजेच्या धक्‍क्‍याने मृत्यू झाला. पुरात हॉटेल  बुडाल्याने त्याच्या चालकाने आत्महत्या केली. कर्तव्यात कसूर केल्याबद्दल महापालिकेच्या एका कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात आली. 

जिल्ह्यावरील महापुराचे संकट हटले आहे. शहर तसेच जिल्हाभरात आरोग्याची साथ पसरू नये, यासाठी स्वच्छता मोहीम महापालिका व ग्रामपंचायतींतर्फे सुरू करण्यात आली आहे. शहरात पाणी उतरू लागल्यानंतर घरांसह दुकानगाळ्यांची स्वच्छता सुरू झाली आहे. महापालिकेचे ८०० कर्मचाऱ्यांचा राबता सुरू झाला आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर महापालिकांच्या गाड्या, आधुनिक स्वच्छता यंत्रांकडून काम युद्धपातळीवर सुरू झालेले आहे. ग्रामीण भागात संबंधित ग्रामपंचायतींकडून स्वच्छता केली जात आहे. जिल्ह्यात महापूर काळात आतापर्यंत मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या २७ पर्यंत वाढली असून जिल्ह्यातील ३.७५ लाख लोकांचे स्थलांतर झाले होते. ५० हजार स्थलांतरित जनावरांनाही आपापल्या घरी नेले जात आहे.

भाजपची पूरग्रस्त साह्यता समितीची स्थापना
मुंबई - भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली भाजपची पूरग्रस्त साह्यता समिती स्थापन करण्यात आली आहे.समितीच्या संयोजकपदी माजी प्रदेश संघटनमंत्री रघुनाथ कुलकर्णी यांची नियुक्ती करण्यात आली. समितीच्या सदस्यपदी मंत्री पंकजा मुंडे, सुभाष देशमुख, गिरीश महाजन, सुरेश खाडे, आशिष शेलार व रवींद्र चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. समितीचे अन्य सदस्य -  खासदार गिरीश बापट, प्रदेश उपाध्यक्ष नीता केळकर, प्रदेश सरचिटणीस आमदार सुरेश हाळवणकर आदींचा समावेश आहे.

पूरग्रस्त गावातील स्वच्छतेसाठी पाच कोटी
मुंबई - पूरग्रस्त गावातील स्वच्छतेसाठी ग्रामपंचायतींना ५ कोटी रुपयांच्या विशेष निधीची तरतूद करण्यात आली आहे. कोल्हापूरमध्ये सुमारे ६०४ पाणीपुरवठा योजना, सांगलीमध्ये १३० पाणीपुरवठा योजना, साताऱ्यामध्ये ९८ पाणीपुरवठा योजना या क्षतिग्रस्त झालेल्या आहेत. तसेच राज्यातील इतर पूरग्रस्त भागांतील योजनाही क्षतिग्रस्त झाल्या आहेत. या सर्व भागांतील स्वच्छता मोहीम व स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था सुरळीत करण्यावर भर दिला जाणार असल्याची माहिती पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी येथे दिली. 

पूरस्थितीमुळे चहापान कार्यक्रम रद्द
मुंबई - राज्याच्या काही जिल्ह्यांत पूरस्थिती व त्यातून काही निष्पाप व्यक्तींचा झालेला मृत्यू या नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला विदेशी महावाणिज्यदूत तसेच अन्य मान्यवरांना स्नेहभोजन आणि स्वातंत्र्यदिनी सायंकाळी आयोजित करण्यात येणारा चहापान कार्यक्रम रद्द केला आहे.

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला विदेशी महावाणिज्यदूत तसेच इतर मान्यवरांना स्नेहभोजन तसेच स्वातंत्र्यदिनी सायंकाळी मुंबईत मान्यवरांसोबत स्नेहोपाहार या कार्यक्रमांचे आयोजन दरवर्षी केले जाते.

मुख्यमंत्र्यांवर ‘३०२’ दाखल करा - पटोले
सांगली - कोल्हापूर-सांगलीतील महापुराबाबत महाराष्ट्र व कर्नाटकचे मुख्यमंत्री एकमेकांना दोष देत आहेत. या दोन्ही मुख्यमंत्र्यांविरुद्ध ‘३०२’चा गुन्हा दाखल करावा. यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे अखिल भारतीय किसान काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी आज येथे पत्रकार परिषदेत सांगितले. पटोले म्हणाले, ‘सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात नऊ दिवस महापुराचे तांडव सुरू आहे. शासकीय यंत्रणा अपयशी ठरली आहे. हा केवळ राजकीय आरोप नसून वस्तुस्थिती आहे.

अतिवृष्टीबाबत दोन तारखेपासून सातत्याने आपत्ती व्यवस्थापनला सूचना करूनही त्यांनी मुद्दाम दुर्लक्ष केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Flood Sangli Kolhapur Loss Flood Affected Government Help