यंदा गळीत हंगाम महिनाभर लांबण्याची चिन्हे

शामराव गावडे
Saturday, 17 October 2020

अवकाळी पावसाने दुष्काळी सह ऊस पट्ट्यात ही जोरदार हजेरी लावली .

नवेखेड (सांगली) : सांगली जिल्ह्यात गेली चार-पाच दिवस झाले सुरू असलेल्या पावसाने ऊस शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. तोडणी योग्य क्षेत्रात पावसाने पाण्याची तळी साठल्याने गळीत हंगाम किमान महिनाभर लांबण्याची चिन्हे आहेत.

साखर कारखान्यांनी यंदाच्या गाळप हंगामाच्या सर्व तयारी केली आहे.  १५ ते २० ऑक्टोबर च्या दरम्यान सर्व कारखान्यांचे गाळप हंगाम सुरू होतील या दृष्टीने कारखान्याने तयार केले होते .परंतु अवकाळी पावसाने दुष्काळी सह ऊस पट्ट्यात ही जोरदार हजेरी लावली .त्यामुळे तोडणी कार्यक्रम लांबणीवर टाकण्या शिवाय कारखान्यांच्या पुढे पर्याय उरलेला नाही. सांगली, कोल्हापूर हे जिल्हे ऊस उत्पादनाचे प्रमुख जिल्हे म्हणून ओळखले जातात. गेल्या चार-पाच दिवसात पावसाने जिल्ह्यात जो हाहाकार उडवून दिला त्यामुळे खरीप पिकासह उसाचे मोठे नुकसान झाले.

यावर्षी गाळपास जानारा ऊस अति पाणी आणि वाऱ्याने संपूर्णपणे आडवा झाला आहे. जास्तीत जास्त एक महिना तर कमीत कमी तीन आठवडे इतका कालावधी गळीत हंगाम सुरू होण्यास लागणार आहे. त्याचा परिणाम गाळप हंगाम उशिरा संपल्यावर होणार आहे. कारखान्यानी साखर उतारा प्रमाणे तोडणी प्रोग्रॅम तयार केला आहे. तो पुन्हा  करावा लागनार आहे. यंदा संपूर्ण राज्यात गतवर्षीच्या तुलनेत ३० ते ४० टक्के वाढले आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील आघाडीच्या कारखान्यांनी गाळप हंगाम वेळेत पूर्ण करण्याचे नियोजन केले होते.

कोरोनाची  परिस्थिती असतानाही प्रतिबंधक उपाय योजना करून  साखरआयुक्तांचे आदेश मानून कारखाना प्रशासनाने  तयारी  केली होती ज्या कारखान्यांची तोडणी यंत्रणा सक्षम आहे त्यांनी १५ ऑक्टोबरपासून हंगाम सुरू करण्याचे नियोजन केले होते  पावसाने वेळापत्रक कोलमडले . सध्यातोडणी करणे अशक्य आहे. वाहन आत घालणे धोक्याचे आहे.१५ दिवसानंतर मुख्य  रस्त्याच्या कडेला असणाऱ्या शेतात ऊस तोडी सुरू होतील अशी चिन्हे आहेत.

अवकाळी पावसाचा मोठा फटका ऊस शेतीला बसला आहे.ऊस तोडणी लांबल्याने व ऊस पडल्याने उत्पादनात  घट होईल.
सुरेश कबाडे, शेतीनिष्ठ शेतकरी कारंदवाडी.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: flood sugar cane farming impact in navekhed sangli crushing season will last at least a month