हाताच्या बोटांची 'कोड लँग्वेज 'लय भारी!

राजेंद्र हजारे
Monday, 16 November 2020

आधुनिक युगात 'गोंधळी' कलाकार जोपासताहेत लोककला : वर्षभर भटकंती सुरु

निपाणी (बेळगाव) : डिजिटल युगात क्यूआर कोड स्कॅन करून ज्या पद्धतीने आर्थिक व्यवहार केले जातात. त्याच धर्तीवर आपल्या हाताच्या बोटांच्या विशिष्ट प्रकारच्या हालचालीवर पूर्वजासह वाडवडिलांचा नामोल्लेख अचूक ओळखता येतो. ही लुप्त होत चाललेली पारंपरिक लोककला डिजिटल युगातही जिवंत राहाण्यासाठी गोंधळी कलाकार आजही जोपासत आहेत. मात्र तेवढ्यावर विसंबून न राहता शासनाने प्रयत्नशील राहणे गरजेचे आहे. येथील आंदोलन नगरातील मूळ रहिवासी विनायक गोंधळी कलाकार पोटाची खळगी भरण्यासाठी शहरांमध्ये घरोघरी जाऊन ही कला दाखवित आहेत.

विनायक व त्यांचे सहकारी संबळ वादक आपल्या बोटांच्या विशिष्ट प्रकारच्या हालचाली करून या कोड लॅंगवेजचा चांगला वापर करतात. आपण सांगितलेल्या वाडवडिलांची नावे ते अचूक ओळखतात. संबळ, टाळ, तुनगे आणि वेगवेगळी गाणी, गौळणीद्वारे ताल लयाच्या ठेक्यात वाडवडिलांचा उद्धार करून यथाशक्ती मिळेल ती आर्थिक तुटपुंजी धान्याच्या रूपातील मदत आणि आशीर्वाद घेऊन पुढच्या दारी भटकंती करून आपला जीवनप्रवास करीत आहेत.

बोटांच्या इशाऱ्याची भाषा हवी 
अभ्यासक्रमात भाषेच्या समृद्धीसाठी विद्यापीठ स्तरावर अनेक अभ्यासक्रम आहेत. बोटांच्या इशाऱ्याची भाषा ही न उमजनारे कोडे आहे. या लोककलेचा अभ्यासक्रमात समावेश केल्यास याची प्रात्यक्षिके करण्यासाठी गोंधळी समाजातील कलाकारांना रोजगार मिळू शकतो.

'मुळात ही भाषा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील गुणचर विभागाची संकेतिक भाषा 'करपावली' या नावाने प्रसिद्ध होती. तिचे संवर्धन होणे आवश्यक आहे'.
-विनायक गोंधळी, आंदोलननगर, निपाणी
 

संपादन- अर्चना बनगे

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Folk art gondhali artist yearly Wandering story by nipani