सोशल डिस्टसिंग पाळत 26 ला पुन्हा ग्रामसभा सुरू होणार 

शिवकुमार पाटील
Monday, 18 January 2021

ग्रामविकासात ग्रामपंचातीच्या ग्रामसभाचे असलेले अनन्यसाधारण महत्व लक्षात घेता ग्रामसभाचे पूर्वीप्रमाणे आयोजन होणे गरजेचे आहे.

किल्लेमच्छिंद्रगड  : ग्रामविकासात ग्रामपंचातीच्या ग्रामसभाचे असलेले अनन्यसाधारण महत्व लक्षात घेता ग्रामसभाचे पूर्वीप्रमाणे आयोजन होणे गरजेचे आहे. ही बाब लक्षात घेवून राज्यातील सर्व ग्रामपंचायतीना त्यांच्या ग्रामसभा सोशल डिस्टसिंगचे तसेच कोरोना महामारीसाठी लागू केलेल्या मार्गदर्शक तत्वाचे काटेकोरपणे पालन करुन पुर्वीप्रमाणे ग्रामसभांचे आयोजन करण्यास परवानगी देण्यात आली आहे. अशा स्वरुपाचा शासन निर्णय 15 जानेवारी (शुक्रवार) रोजी राज्य शासनाने पारीत केला आहे. 

कोरोना विषाणूच्या प्रसारास प्रतिबंध करण्यासाठी राज्य, केंद्र शासनाने वेळोवेळी आदेश, अधिसुचना लागू केल्या होत्या. शासन आदेशानुसार सर्व प्रकारच्या सामाजीक, राजकिय सभावर व संमेलनावर बंदी घालण्यात आली होती. सदर आदेश व कोरोना या संसर्गजन्य आजारामुळे असणारी आपत्कालीन स्थिती विचारात घेता ग्रामसभामध्ये असणारी ग्रामस्थांची उपस्थिती व त्यामुळे होणारी गर्दी आजाराच्या प्रादुर्भावाचे दृष्टीने योग्य नाही. 

ही बाब विचारात घेवून शासन निर्णयानुसार ग्रामसभा घेण्यास तात्पुरत्या स्वरुपाची स्थगिती देण्यात आली होती. सद्यस्थितीत कोरोनाच्या अनुषंगाने लॉकडाऊनकाळातील जनजीवन पुर्वपदावर येत असल्याने पूर्वीच्या शासन निर्णयाद्वारे ग्रामसभांना देण्यात आलेली स्थगिती उठविण्याबाबतची बाब राज्य शासनाच्या निर्णयाधिन होती. त्यावर निर्णय होवून सोशल डिस्टसिंग तसेच कोरोनासाठी लागू असलेल्या मार्गदर्शक तत्वाचे काटेकोरपणे पालन करुन ग्रामसभा घेता येणार असल्याचा शासन निर्णय लागू करण्यात आला आहे. 

 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Following the social disturbance, Gram Sabha will resume on 26th