पूरग्रस्तांसाठी भोजनाची निविदा प्रलंबित 

बलराज पवार
Thursday, 9 July 2020

संभाव्य महापुराच्या पार्श्वभूमीवर स्थलांतरित होणाऱ्या पूरग्रस्तांना भोजन, नाष्टा आदी पुरवण्यासाठी 45 लाख 36 हजार रुपयांच्या निविदेचा विषय सभेसमोर होता.

सांगली : संभाव्य पूरग्रस्तांसाठी भोजन, नाष्टा पुरवण्याबाबत काढण्यात येणारी निविदा प्रलंबित ठेवण्याचा निर्णय आज स्थायी समिती सभेत घेण्यात आला. लेखाशीर्षमध्ये यासाठी तरतूद नसल्याने आधी महासभेमध्ये तरतूद करा आणि नंतर पुढच्या स्थायी समिती समोर निविदेचा विषय सादर करण्याची सूचना अधिकाऱ्यांना दिल्याची माहिती सभापती संदीप आवटी यांनी दिली. 

सभापती संदीप आवटी यांच्या अध्यक्षतेखाली आज ऑनलाइन पद्धतीने स्थायी समितीची सभा झाली. मनोज सरगर, अभिजित भोसले, लक्ष्मण नवलाई आदी सदस्य आणि अधिकारी सहभागी झाले होते. संभाव्य महापुराच्या पार्श्वभूमीवर स्थलांतरित होणाऱ्या पूरग्रस्तांना भोजन, नाष्टा आदी पुरवण्यासाठी 45 लाख 36 हजार रुपयांच्या निविदेचा विषय सभेसमोर होता. मात्र नैसर्गिक आपत्ती व मदतकार्य या लेखाशीर्षमध्ये यासाठी केवळ 10 लाख रुपयांची तरतूद आहे. त्यातील सहा लाख 41 हजार रुपये यापूर्वीच खर्च केले आहेत.

त्यामुळे केवळ तीन लाख 58 हजार रुपये लेखाशीर्षमध्ये शिल्लक आहेत. त्यामुळे तरतूद नसेल तर प्रशासन हा खर्च कसा करणार असा सवाल सदस्यांनी उपस्थित केला. शिवाय यावर वाढीव 40 लाख रुपयांच्या खर्चास निधी मंजुरीचा प्रस्ताव स्थायीसमोर ठेवल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. मात्र आधी या खर्चाची तरतूद महासभेत करा, नंतर स्थायीसमोर विषय मंजुरीसाठी आणावा अशा सूचना सभापती आवटी यांनी प्रशासनाला केली. 

गणेशमुर्ती उठावाच्या बिलाची आयुक्तांशी चर्चा 
गतवर्षीच्या गणेशोत्सवात दान मिळालेल्या गणेशमूर्तींच्या उठावासाठी 10 डंपर भाड्याने घेतले होते. त्यांचे 10 लाख रुपयांचे बिल देण्याचा विषयही आजच्या सभेत होता. त्यावर आयुक्तांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल असेही आवटी यांनी सांगितले. आरोग्य अधिकारी सुनील आंबोळे यांना या 

बिलाबाबत उत्तर देता आले नाही. 
आवटी म्हणाले, सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत महापालिका क्षेत्रात साडे तीन कोटी रुपयांच्या कामाचे प्रस्ताव तयार करण्यात आले आहेत. जिल्हा नियोजन समितीकडे हे प्रस्ताव मंजूरीसाठी पाठविण्याचे आजच्या सभेत ठरले. 

संपादन - शैलेश पेटकर 
 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Food tender pending for flood victims