या पोस्टकार्डने जोडली १५१ देशांमधली माणसं ! 

बी. डी. चेचर
बुधवार, 15 जानेवारी 2020

इंटरनेटवर तिला ‘पोस्ट क्रॉसिंग डॉट कॉम’ या संकेतस्थळावरून वेगवेगळ्या देशातील काही पत्ते मिळाले आणि तिचा पोस्टकार्ड पाठवण्याचा प्रवास सुरू झाला.

कोल्हापूर - इंटरनेटच्या युगात जग आपल्या मुठीत आले असले तरी येथील सपना ओसवाल हिने पोस्टकार्डच्या माध्यमातून जगभरातील तब्बल १५१ देशातील लोकांचे नेटवर्क तयार केले आहे. त्या त्या भाषेत सुंदर हस्ताक्षरांत पोस्टकार्डे लिहून त्यांनी हे नेटवर्क अधिक व्यापक केले आहे. 

‘पोस्ट क्रॉसिंग डॉट कॉम’ मिळाले पत्ते

सपनाला पहिल्यापासून चित्रकला व माणसं जोडण्याची आवड. तिचं शिक्षण मास कम्युनिकेशन. इंटरनेटवर तिला ‘पोस्ट क्रॉसिंग डॉट कॉम’ या संकेतस्थळावरून वेगवेगळ्या देशातील काही पत्ते मिळाले आणि तिचा पोस्टकार्ड पाठवण्याचा प्रवास सुरू झाला. सुरुवातीला अकरा ते बारा देशांतील लोकांशी पोस्टकार्डने संपर्क साधल्यानंतर तिच्या घरी आलेल्या इंग्रजी आणि त्या-त्या भाषेतून सुंदर लिहीलेल्या पोस्टकार्डमुळे तिचा आत्मविश्‍वास आणखी वाढला. आजवर १५१ देशातील संस्कृतीची तिची आता या माध्यमातून एक नवी ओळख निर्माण झाली आहे. 

पाहा - बहिणीच्या नवऱ्याला किडनी देत जपलं तिच कुंकू....

सपनाच्या आवडीमुळे परदेशातीलही लोकांनाही तिची भुरळ

गेल्या तीन वर्षापासून पोस्टकार्ड पाठवण्याचे तिचे काम सुरू आहे. अमेरिका, जर्मन, जपान, रशिया, ऑस्ट्रेलिया या देशातील लोकांनी तिला देशाचे लोगो, स्टिकर, पोस्टकार्ड, डॉलरसह काही वस्तू पाठविल्या आहेत. ज्या ज्या देशातील लोकांना तिने पत्रव्यवहार केला त्यांनी तिला पोस्टकार्ड किंवा इतर गोष्टींतून उत्तर दिले आहे. इंटरनेटच्या युगातही पोस्टकार्डच्या आकर्षणामुळे सपना दररोज घरात प्रवेश करताना पहिल्यांदा पोस्टबॉक्‍स बघते आणि मगच घरात जाते. सध्या भारतात काही ठिकाणी ‘‘इंडियन पोस्ट क्रॉसिंग’ ग्रुप सक्रिय आहेत आणि त्या माध्यमातून लाखो लोक एकमेकांशी जोडले गेले आहेत. सपनाच्या आवडीमुळे परदेशातीलही लोकांनाही तिची भुरळ पडल्यामुळे पोस्टकार्ड संपर्काचे जाळे आणखी घट्ट होत आहे.

असेही एक उत्तर

मी स्वतः लिहिलेली पोस्टकार्ड पाठवतो ते माझं भाग्यच समजते; तू ज्यावेळी माझ्या देशात येशील त्या वेळी निश्‍चितच आपण भेटू या. मी पाठवलेल्या सुंदर हस्ताक्षरांतील पोस्टकार्डमुळे तुला नेहमी आनंद मिळेल, असे ऑस्टिन- टेक्‍सास (अमेरिका) येथील मिलीसा मोईर यांनी कळवले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: foreigners people connected by postcard to kolhapur girl