बहिणीच्या नवऱ्याला किडनी देत जपलं तिच कुंकू....

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 जानेवारी 2020

बहिणीच्या नवऱ्याला किडनी देऊन वेगळ्या पद्धतीने भाऊबीजेची ओवाळणी देताना बहिणीच्या सौभाग्यालाही एकप्रकारे बळ दिले आहे.

कोल्हापूर - आई-वडिलांनी मुलाला किंवा मुलाने आई, वडील किंवा बहीण, भावाला किडनी देऊन जीवदान दिल्याच्या अनेक घटना आहेत. पण कसबा बावडा येथील गणेश वावरे या तरुणाने बहिणीच्या नवऱ्याला किडनी देऊन वेगळ्या पद्धतीने भाऊबीजेची ओवाळणी देताना बहिणीच्या सौभाग्यालाही एकप्रकारे बळ दिले आहे. २१व्या शतकातही नातं जपणारी माणसं आहेत, याची प्रचिती गणेश वावरे या कसबा बावड्यातील युवकाने स्वतःच्या बहिणीच्या नवऱ्याला स्वतःची किडनी दान करून आणून दिली आहे. 

बहिणीच्या ‘सौभाग्या’ला भावाचे बळ

कसबा बावडा येथील धनगर गल्लीत गणेश राहतो. त्याची बहिणी दीपाली यांचे पती दीपक ढंग पोलिस दलात अलीकडेच फौजदार होऊन नागरी हक्क संरक्षण कक्षाकडे कार्यरत होते. फौजदार पदाची खात्यांतर्गत परीक्षा होण्यापूर्वीच दीपक यांच्या दोन्हीही किडन्या निकामी झाल्या होत्या. पोलिस दलातूनच निवृत्त झालेले त्यांचे वडील रामचंद्र ढंग यांनी एक किडनी देऊन त्याला जीवदान दिले. याची उतराई दीपक यांनी फौजदार होऊन केली. पण पुन्हा दीपक यांना किडनीचा त्रास जाणवू लागला.

पाहा - ऊस तोडणारी तीन माणसांची टोळी

गणेशने दिली बहिणीच्या नवऱ्याला किडनी

अलिकडेच त्यांच्यावर उपचार सुरू असताना वडिलांची बसवलेली किडनीही निकामी झाल्याचे निदान झाले आणि या कुटुंबावर आभाळच कोसळले. पण अशाही परिस्थितीत खचून न जाता या कुटुंबाने पुन्हा जिद्दीने या संकटाचा सामना करण्याचे ठरवले.
अनेक चित्रपटांत बहीण-भावाच्या प्रेमाच्या कहाण्या आपण बघितल्या आहेत; पण प्रत्यक्ष वास्तवात गणेश वावरे हा तरुण बहिणीसाठी देवदूत म्हणूनच धावून आला. दीपक यांच्यावर पुन्हा किडनी रोपणाची शस्त्रक्रिया करावी लागणार, असे डॉक्‍टरांनी सांगितल्यानंतर ही किडनी देणार कोण? हा प्रश्‍न ढंग आणि वावरे कुटुंबासमोर उभा राहिला; पण क्षणाचाही विलंब न करता गणेशने दाजींना किडनी देण्याची तयारी दर्शवली. सर्व वैद्यकीय चाचण्या आणि सोपस्कर पूर्ण झाल्यानंतर ११ डिसेंबरला मुंबईतील एका खासगी रुग्णालयात ही किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वी झाली आणि या किडनी दानातून बहिणीच्या सौभाग्याला बळ देण्याबरोबरच गणेशने बहिणीला भाऊबीजेचीही ओवाळणी एका वेगळ्या स्वरूपात दिली. गणेशच्या या धाडसाचे कौतुक होत असून शस्त्रक्रियेनंतर या दोघांचीही प्रकृती उत्तम आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kidney donated to sister's husband kolhapur marathi news

टॅग्स