आर आर पाटील
आर आर पाटील esakal

स्व. आर. आर. (आबा) पाटील विनम्र अभिवादन

कर्तृत्ववान, खंबीर नेता

चांद्यापासून बांद्यापर्यंत आजही आर. आर. आबांच्या आठवणी जागवल्या जात आहेत, यातच त्यांच्या कामाची पावती मिळते. जिल्हा परिषदेपासून महाराष्ट्राच्या विधानसभेपर्यंत आबांनी सर्वसामान्य माणूस डोळ्यांसमोर ठेवून केलेले काम आबांच्या आठवणी जागवत आहे. १९७९ मध्ये जिल्हा परिषदेत काम करत असल्यापासून मिळालेले पद हे काम करण्यासाठी आहे, या भावनेने केलेल्या कामाची पावती त्यांना विधानसभा निवडणुकीत मिळाली. ‘व्यक्तिगत कामापेक्षा सर्वसामान्य माणसांसाठी केलेले काम समाज विसरत नाही,’ असे आबा नेहमी म्हणायचे.

शेवटपर्यंत त्यांच्या कामाची हीच पद्धत राहिली. जिल्हा परिषदेचे पूर्णवेळ निवासी सदस्य अशी त्यांची ओळख बनली होती. सुदैवाने त्यांना एकावेळी ११ वर्षे काम करण्याची संधी मिळाली. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून काम करताना तासगाव तालुक्यातील दुष्काळ आणि पाणी डोळ्यांसमोर ठेवून केलेले काम १९९० मध्ये त्यांना विधानसभेपर्यंत घेऊन गेले.

नेता मोठा होतो, तो त्याच्या कर्तृत्वाने. आबांचे सामाजिक, राजकीय कामच आज महाराष्ट्रात मैलाचा दगड ठरले आहे. त्यांनी जिल्हा परिषदेप्रमाणेच विधानसभेतही अल्पावधीत छाप पाडली. ‘उत्कृष्ट संसदपटू’ अशीच त्यांची प्रतिमा राहिली. विधानसभेच्या सभागृहात त्यांच्या वाणीला विशेष बहर येत असे. १९९५ मध्ये युतीचे सरकार आले. तेव्हा विधानसभेत आबांनी सत्ताधाऱ्यांना अक्षरशः सळो की पळो करून सोडले होते. सत्तारूढ पक्षापेक्षा विरोधी पक्षाची जबाबदारी मोठी असते, अशा भावनेनेच ते काम करत होते. परिणामी पहिला ‘उत्कृष्ट संसदपटू’चा मान त्यांना लाभला. कृष्णा खोरे, सहारा प्रकरण, किणी प्रकरण अशा अनेक प्रकरणांत त्यांनी सत्ताधाऱ्यांना जेरीस आणले. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी १९९९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली, तेव्हा त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आल्यानंतर त्यांनी ग्रामविकास आणि पाणीपुरवठा खात्याचे मंत्री म्हणून पदभार स्वीकारला.

जातील तेथे स्वतःच्या कामाचा ठसा त्यांनी उमटवला. त्यांनी राबविलेले संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान आणि राष्ट्रसंत तुकडोजी स्वच्छ ग्राम स्पर्धा खेड्यांच्या व्यापक परिवर्तनाचे माध्यम ठरल्या. ‘यूनो’ने सुद्धा त्याची दखल घेतली. स्थानिक स्वराज्य संस्थांना जादा अधिकार, पाणीपुरवठा योजनांची प्रभावी अंमलबजावणी ही त्यांची दखल घेण्यासारखी कामे म्हणता येतील. २२ डिसेंबर, २००३ ला त्यांची प्रथम गृहमंत्री म्हणून निवड झाली. सुरवातीला राज्याला कलंक असलेले डान्स बार बंद करण्याचा त्यांचा निर्णय चर्चेचा विषय ठरला. सामाजिक बांधिलकीची जाणीव गृहखात्याची जबाबदारी स्वीकारतानाही कायम असल्याचा संदेश त्यांनी त्यातून दिला. सुरवातीच्या काळातील तेलगी प्रकरणातील सत्य शोधताना पोलिस अधिकाऱ्यांचीही गय केली नाही.

एमपीएससी’मधील घोटाळा उघडकीस आणला, पोलिसांची डागाळलेली प्रतिमा दूर करण्याचा प्रयत्न केला. राज्यातील पोलिस भरतीमध्ये होणारा भ्रष्टाचार चक्क अधिकाऱ्यांना निलंबित करून बंद केला, पारदर्शी पोलिस भरतीमुळे योग्यतेची, सर्वसामान्यांच्या घरातील मुलेही पोलिस होऊ लागली. अलीकडच्या काळात त्यांनी महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान सुरू करून तंटे-बखेडे- भांडणांमुळे दुरावलेली मने जोडण्याचे काम त्यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणूनही काम करताना त्यांनी प्रदेशाध्यक्षपदाला वजन मिळवून दिले. पण दुर्दैवाने नियतीला हे मान्य नव्हते आणि अचानक एका पर्वाची अखेर झाली.

आबा...! आर. आर. आबा...! या नावातील जादू आजही कायम आहे. आजही आबांच्या आठवणी विसरू म्हणता विसरेनात अशा आहेत. १९५७ ते २०१६ अवघा ५९ वर्षांचा काळ; पण मिळालेल्या संधीचे सोने करत सर्वसामान्यांना आपल्या वाटणाऱ्या कामांतून आर. आर. आबांनी मनामनांत स्वतःचे स्थान निर्माण केले. आज त्यांना जाऊन आठ वर्षे झाली; मात्र त्यांच्या आठवणी विसरू म्हणता विसरेनात अशा आहेत. एका गरीब कुटुंबातील एक साधा मुलगा बघता-बघता महाराष्ट्राचे सामाजिक अवकाश व्यापून टाकतो, ही काही साधी गोष्ट नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com