'मला कीप क्वाईट म्हणणारे कोण तुम्ही?' : ऍड. नागेश सातेरी व आमदार अभय पाटील यांच्यात जुंपली

Former Mayor Adv. Nagesh Sateri and MLA Abhay Patil criticize belgaum atmosphere in the municipal hall is tense
Former Mayor Adv. Nagesh Sateri and MLA Abhay Patil criticize belgaum atmosphere in the municipal hall is tense

बेळगाव : स्मार्ट सिटी योजनेतील निकृष्ट कामे व शहरातील समस्यांबाबत नगरविकासमंत्री बैराती बसवराज यांच्या भेटीसाठी गेलेले माजी महापौर ऍड. नागेश सातेरी व आमदार अभय पाटील यांच्यात शुक्रवारी (ता.8) जोरदार वाद झाला. या वादामुळे महापालिका सभागृहातील वातावरण तणावपूर्ण झाले. यावेळी दोहोंनी एकमेकांचा एकेरी उल्लेख केला, त्यामुळे वाद वाढला. यावेळी आमदार पाटील आपल्या आसनावरून उठून ऍड. सातेरी यांच्यावर धावून गेले, पण मंत्री बसवराज यांनीच त्याना खाली बसविले. माजी नगरसेवक संघटनेच्या वतीने अध्यक्ष म्हणून ऍड. सातेरी समस्या मांडत असतानाच हा वाद सुरू झाला.

ऍड. सातेरी यांनी स्मार्ट सिटी योजनेतील कामे निकृष्ट झाल्याचे व अद्याप 70 टक्के कामे पूर्ण झाली नसल्याचे सांगताच आमदार पाटील यांनी त्याला आक्षेप घेतला. त्यावर 'मला बोलायला द्या' अशी विनंती सातेरी यांनी आमदार पाटील यांना केली, पण चुकीची माहिती देवू नका असे पाटील म्हणाले. त्यावर 'चुकीची माहिती देत नाही, मंत्र्यांना घेवून पाहणीसाठी चला' असे सातेरी म्हणाले. शिवाय त्यानी संघटनेच्या वतीने समस्या मांडणे सुरूच ठेवले. पण आमदार पाटील यांनी तक्रारीवर आक्षेप घेणे सुरूच ठेवले. त्यामुळे वैतागलेल्या सातेरी यांनी 'तुम्हाला माझ्याशी भांडण करावयाचे आहे का? असा सवाल आमदारांना केला व 'प्लीज कीप क्वाईट' अशी विनंती केली. त्यावर आमदारांचा पारा वाढला व 'मला कीप क्वाईट म्हणणारे कोण तुम्ही?' असा सवाल केला. 
त्यातून वाद वाढला व तो एकेरीवर गेला. कीप क्वाईट म्हणणारा तू कोण? मला सांगणारा तू कोण? असे सवाल व प्रतिसवाल विचारले गेले. गप्प बे, चल बे अशा वाक्‍यांचा वापरही यावेळी झाला. तुझ्या किती इमारती अनधिकृत आहेत मला माहिती आहे, त्याची यादीच देतो अशी धमकीच आमदारांनी सातेरी याना दिली. 

कुठे काय काय बांधले आहे त्याची माहिती देतो असेही आमदार मंत्री बसवराज यांना म्हणाले. पण मंत्र्यांनी सामंजस्याची भूमिका घेतली. त्यांनी माजी नगरसेवक लतीफखान पठाण यांना बोलावून त्यांच्याकडून नेमक्‍या समस्या ऐकून घेतल्या. यावेळी माजी महापौर ऍड. एन. बी. निर्वाणी, माजी उपमहापौर ऍड. धनराज गवळी यांनी आमदार पाटील याना समजावण्याचा प्रयत्न केला, पण ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते, त्यामुळे वाद पुन्हा वाढला. उपस्थित माजी नगरसेवकांनी विनंती केल्यानंतर ऍड. सातेरी यानी माघार घेतली व तेथून सभागृहाबाबेर निघून गेले. त्यानंतर मंत्री बसवराज यांनी समस्या ऐकून घेतल्या. त्याबाबतची सविस्तर माहिती मला द्या मी स्वतः पाहणी करतो असे ते म्हणाले. संघटनेच्या मागण्यांचे निवेदन देवून माजी नगरसेवक सभागृहातून निघून गेले. 

संपादन- अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com