esakal | महापालिका क्षेत्रात दोन आठवड्यात चौपट रुग्ण; हॉटस्पॉट जिल्ह्या'तून, राज्यातून आले प्रवासी 
sakal

बोलून बातमी शोधा

Four times patients increases in Sangali municipal area

सांगली महापालिका क्षेत्रात गेल्या आठवडाभरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सतत वाढताना दिसत आहे.

महापालिका क्षेत्रात दोन आठवड्यात चौपट रुग्ण; हॉटस्पॉट जिल्ह्या'तून, राज्यातून आले प्रवासी 

sakal_logo
By
बलराज पवार

सांगली : महापालिका क्षेत्रात गेल्या आठवडाभरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सतत वाढताना दिसत आहे. मुंबई, पुणेसह कोरोनाच्या हॉटस्पॉट जिल्ह्यातून, राज्यातून आलेल्या प्रवाशांमुळे गेल्या दोन आठवड्यात चौपट रुग्णवाढ झाल्याचे समोर आले आहे. 

महापालिका क्षेत्रात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गेले तीन महिने प्रशासनाने चांगले नियोजन केले आहे. त्यामुळे पहिले तीन महिने कोरोनाबाधितांची संख्या वाढली नाही. 25 जूनपर्यंत महापालिका क्षेत्रातील रुग्णांची संख्या 12 होती. त्यानंतर गेल्या पंधरवड्यात हाच आकडा सुमारे चौपट वाढला. आज दुपारपर्यंत महापालिका क्षेत्रातील रुग्णांची संख्या 52 झाली होती. कोरोनाच्या हॉटस्पॉट जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांची संख्या जून महिन्यात वाढू लागली. त्यामुळे शिराळा, आटपाडी, जत हे तीन तालुके हॉटस्पॉट झाले. विशेष करुन पुणे, मुंबई या दोन महानगरात वेगाने कोरोना पसरल्यानंतर तेथून मोठ्या संख्येने मूळचे सांगलीकर गावाकडे परतू लागले. 

महापालिका क्षेत्रात 22 जूनपासून तीन महिने कोरोनाला रोखण्यात प्रशासनाला यश आले होते. मात्र गेल्या दोन आठवड्यात तब्बल पाच पट संख्या वाढली आहे. 25 जूनपर्यंत 12 कोरोनाबाधित महापालिका क्षेत्रात होते. परंतू 26 जूनपासून यात रुग्णांची भर पडू लागली. यामध्ये मुंबईशी संपर्क असलेल्यांचा भरणा अधिक आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या काही स्थानिक नागरिकांनाही संसर्ग झाला. पण, अजूनतरी कम्युनिटी संसर्ग होत नसल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. मात्र याला रोखण्यासाठी महापालिका क्षेत्रात उपाययोजना करण्याची गरज आहे. 

परदेशी प्रवाशीही निघाले पॉझिटीव्ह 
बाहेरच्या जिल्ह्यातून आलेल्या नागरिकांबरोबरच कर्नाटकमधूनही काही रुग्ण उपचारासाठी शहरात आले आहेत. तर परदेशातून विशेषत: रशियातून आलेल्या पाचजणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. मात्र हे सर्वजण परदेशातून आल्यावर थेट हॉटेलमध्ये क्वारंटाईन झाले होते. त्यामुळे ते मूळचे सांगलीतील असले तरी त्यांच्या निवासाच्या परिसरात कंटेन्मेंट झोन करण्याची गरज पडली नाही. 

स्वॅब तपासणीतून काहीजण पॉझिटीव्ह 
मुंबईतून आलेल्या प्रवाशांमध्येच कोरोनाची लागण झाल्याचे अहवालातून दिसू लागल्यावर महापालिका क्षेत्रातही कोरोनाच्या हॉटस्पॉटमधून येणाऱ्या नागरिकांची स्वॅब तपासणी करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी घेतला. त्यामुळे अशा प्रवाशांची स्वॅब तपासणी 23 जूनपासून करण्यात येऊ लागली. आजवर 50 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक तसेच इतरांचे असे सुमारे चारशे नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे. यातील काही नागरिकांचे स्वॅबचे अहवाल पॉझिटीव्ह आले. 

पॉझिटीव्हवर तातडीने उपचार सुरु
महापालिकेने बाहेरगावच्या प्रवाशांचे स्वॅब घेण्यास प्रारंभ करुन पुढाकार घेतला. त्यामुळे यातील जे पॉझिटीव्ह आले, त्यांच्यावर तातडीने उपचार सुरु करता आले. तसेच खबरदारीची उपाय योजना करण्यात आली आहे. 
- डॉ. रविंद्र ताटे, आरोग्य अधिकारी